दशरथ ननावरे
खंडाळा : ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. खंडाळा तालुक्यात या योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांनी घरकुल मागणी केली. त्यापैकी सुरुवातीची केवळ ३१५ घरे पूर्ण झाली. मात्र त्यानंतर गेल्या दोन वर्षांत तालुक्यात एकही घर मंजूर झाले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेस घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण यादीतील बेघर व कच्चे घर असलेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी यादी निश्चित करण्यात आली. बेघर व कच्चे घर व्यतिरिक्त कुटुंबे या यादीत समाविष्ट करण्यात आली. शासनाच्या आवास सॉफ्टवेअर वेबसाईटवर या याद्या नोंद करण्यात आल्या. आवास योजनेसाठी ही यादी कायम प्राधान्य यादी झाली. या यादीतील कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात येऊ लागले. दरम्यान, देशभरातून लोकप्रतिनिधी जनतेच्या तक्रारी वाढल्या. पात्र व्यक्ती यादीबाहेर राहिल्याकडे व अपात्र व्यक्ती यादीत समाविष्ट झाल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे पात्र लाभार्थींना अर्ज करण्यास शासनाने संधी दिली. ग्रामपंचायतीकडे अर्ज करण्यात आले आणि ग्रामसभेत या अर्जांचे वाचन करून यादी तयार झाली.
खंडाळा तालुक्यात यादीत ४ हजार ४०२ कुटुंबे आहेत. याशिवाय रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, शबरी आवास योजना अंतर्गत वेगवेगळी मागणी आहे. यादीतील कुटुंबांची संख्या प्रत्येक तालुक्यात मोठी आहे. त्यामुळे शासनाने अपात्र कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी एकवीस निकषांची चाळण निश्चित केली आहे. अपात्र व्यक्तींना यादीतून वगळण्याची कार्यवाहीसाठी त्या अनुषंगाने सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
अशी लागणार चाळण...
दुचाकी, चारचाकी व यांत्रिकी बोट असणारे कुटुंब, कृषी यंत्र असणारे कुटुंब, ५० हजार व त्यापेक्षा अधिक किमतीचे किसान क्रेडिट कार्डधारक कुटुंब. सरकारी नोकरीत सदस्य असणारे कुटुंब, बिगर कृषी व्यवसाय उद्योग ज्याची नोंद शासनाकडे केली आहे असे कुटुंब. कुटुंबातील कोणत्याही एकाची सध्याची मासिक मिळकत दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असणारे कुटुंब, आयकर भरणारे कुटुंब, व्यवसाय करणारे कुटुंब, रेफ्रिजरेटर असणारे कुटुंब, लँडलाइन फोन असणारे कुटुंब, अडीच एकरपेक्षा जास्त शेतजमीन सिंचनाखाली असणारे कुटुंब, दोन किंवा अधिक पीक हंगामात घेणारे पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे कुटुंब. पक्के घर असणारे किंवा सध्या पक्के घर बांधकाम असलेले गेलेले कुटुंब, दुबार नोंदणी झालेले कुटुंब, घरकुलासाठी इच्छुक नसलेले कुटुंब, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले कुटुंब या निकषाप्रमाणे पुन्हा सर्वेक्षण जॉबकार्ड मॅप व आधारलिंकद्वारे करून अंतिम यादी होणार आहे.
खंडाळा तालुक्यातील पाच वर्षांतील स्थिती -
योजना उद्दिष्ट मंजूर पूर्ण
प्रधानमंत्री - ४२५ ४०१ ३१५
रमाई - ४०८ ४०८ ३०८
पारधी ७ ६ ६
शबरी २४ २० १९