रशिद शेखऔंध : आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आपल्या देशावर खूप प्रेम आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण देशासाठी काही ना काही केले पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतो, सेवा करण्यासाठी संधी शोधत असतो. असाच एक औंधमधील अवलिया प्रदीप बाबूराव हजारे हे गेली ४० वर्षे औंध येथील श्री श्री विद्यालयात होणाऱ्या सार्वजनिक ध्वजारोहण सोहळ्यात वापरला जाणारा ध्वज आजअखेर मोफत इस्त्री करून देत आहेत. त्यांच्या या अनोख्या देशसेवेचे समाजमाध्यमांवर कौतुक होत आहे.प्रदीप हजारे यांनी वयाच्या बाराव्या वर्षांपासून पारंपरिक व्यवसायाला सुरुवात केली व वयाच्या १९ व्या वर्षांपासून त्यांनी २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मोफत ध्वज इस्त्री करून देण्याचा निश्चय केला. आज त्यांचे वय ५९ आहे. त्यांचे शिक्षण दुसरीपर्यंतच. कमी शिक्षण असूनही आपण देशासाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेतून त्यांनी सुरू केलेले हे काम आजअखेर न चुकता विनाखंड सुरू आहे.या विद्यालयाबरोबरच औंध पोलिस ठाणे, महावितरण, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत, चावडी, वस्तूसंग्रहालय आदी ठिकाणीही वर्षातून दोनवेळा ते ध्वज इस्त्री करून देत असतात. अनेकवेळा या कामाबद्दल संबंधितांनी त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी नम्रपणे नकार दिला. पूर्वीच्या काळी पितळीची इस्त्री असायची; आता लोखंडी आलेली आहे. आजही ते कोळशावर चालणारी इस्त्रीचाच वापरत करतात. जोपर्यंत हा व्यवसाय मी करणार आहे, जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत हे काम असेच विनामूल्य सुरू ठेवणार असल्याचे मत प्रदीप हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कोरोना काळातही खंड नाही..कोरोना कालावधीत लॉकडाऊनमध्येही हजारे यांनी या कामात खंड पडून दिला नाही. कोळशाची इस्त्री पेटवून ध्वज काळजीपूर्वक इस्त्री करून पोहोच केल्याची आठवण ते आवर्जून सांगत होते.
आमच्या संस्थेचा ध्वज मागील ४० वर्षांपासून विनामूल्य, अखंडपणे प्रदीप हजारे हे इस्त्री करून देत आहेत. इस्त्रीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करणारी ही व्यक्ती निस्सीम देशभक्तीचे एक हे उदाहरण आहे. - एस.बी. घाडगे, प्राचार्य, औंध