राष्ट्रवादीच्या प्रचारात जोरदार शक्तिप्रदर्शन
By Admin | Updated: April 6, 2016 00:20 IST2016-04-05T23:10:09+5:302016-04-06T00:20:53+5:30
चर्चेला चोख प्रतिउत्तर देत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद शहरात भव्य रॅली काढण्यात आली.

राष्ट्रवादीच्या प्रचारात जोरदार शक्तिप्रदर्शन
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा नारळ फोडला. तीन प्रभागात राष्ट्रवादीला उमेदवार नसल्याने पक्ष कमकुवत झाल्याच्या चर्चेला चोख प्रतिउत्तर देत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद शहरात भव्य रॅली काढण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसने लोणंद नगरपंचायतीपासून प्रचाररॅलीला प्रारंभ केला. संपूर्ण शहरात झेंडे, पताका घेऊन मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी पूर्ण केली. यावेळी मिलिंद पाटील, आनंदराव शेळके, नितीन भरगुडे-पाटील, दत्तानाना ढमाळ, रमेश धायगुडे, मनोज पवार, राजेंद्र तांबे, स्नेहलता शेळके, नंदा गायकवाड, विश्वास शिरतोडे, भरत शेळके, विठ्ठल शेळके, प्रदीप क्षीरसागर, नाना जाधव, एन. डी. क्षीरसागर सहभागी झाले.
आमदार पाटील म्हणाले, ‘पहिल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयासाठी चंग बांधला आहे. राष्ट्रवादी पहिल्याच प्रयत्नात मागे पडल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. बॅकफूटवरून फ्रंट फूटला एका रात्रीत कसे यायचे याची क्षमता आमच्याकडे आहे. सत्तेच्या जीवावर मतांचा जोगवा मागण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी दक्षपणे राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
मकरंद पाटील यांच्या काठीचा
लोणंदमध्ये जलवा
आमदार मकरंद पाटील यांनी विधानसभेचा पहिला विजय चालण्याच्या काठीच्या चिन्हावर मिळविला होता. लोणंद नगरपंचायतीत त्यांना मानणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी ‘काठी’ चिन्ह घेण्याकडेच कल दाखविला. काठी चिन्ह मिळविण्यासाठी चुरस लागली होती. तसेच लोणंद सोसायटीतही ‘काठी’चाच विजय झाला होता. त्यामुळे मकरंद पाटील यांच्या काठीचा जलवा अजूनही लोणंदमध्ये दिसून येतोय.