सत्तांतराची लाट !
By Admin | Updated: August 6, 2015 23:07 IST2015-08-06T23:07:31+5:302015-08-06T23:07:31+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : माणमध्ये शेखर गोरेंची मुसंडी, फलटणमध्ये ६८ ठिकाणी राजे गटाचा दावा तर पाटणमध्ये शंभूराज गटाची बाजी

सत्तांतराची लाट !
सातारा : जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना जबरदस्त ‘दे धक्का’ देत सत्तांतराची लाट उसळल्याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. १00 पेक्षाही जास्त गावांमध्ये परिवर्तन झाले आहे. माण तालुक्यात शेखर गोरे गटाने जोरदार मुसंडी मारली असून, फलटण तालुक्यातही राजे गटाने नेत्रदीपक यश मिळविले आहे. कऱ्हाड, खंडाळा, पाटण अन् कोरेगाव तालुक्यांतील काही मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागल्याने तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.७११ ग्रामपंचायतींपैकी १६१ ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले होते. मात्र, उर्वरित ५४७ ग्रामपंचायतींमध्ये काँटे की टक्कर झाली. प्रस्थापितांनी जुन्याच भिडूंना सोबत घेऊन उभ्या केलेल्या पॅनेलची इमारत अनेक ठिकाणी कोसळल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना घरी बसविले आहे.
वाई तालुक्यातील बावधन ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यामध्ये आमदार गटाला यश आले. उडतारे ग्रामपंचायतीमध्ये काँगे्रसने ५ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. मात्र, आमदार मकरंद पाटील यांच्या गटाने आधीच दोन जागा बिनविरोध केल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता राखली.माण तालुक्यात ५२ ग्रामपंचायतींपैकी शेखर गोरे गटाने २६ ग्रामपंचायतींमध्ये जोरदार मुसंडी मारली. आ. जयकुमार गोरे गटाकडे १९ ग्रामपंचायती राहिल्या. खटाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्येही शेखर गोरेंच्या गटाने शिरकाव केला आहे. खटाव तालुक्यातील पुसेगाव, निमसोड, धोंडेवाडी, कातरखटाव या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख यांच्या विचारांच्या गटाची सत्ता आली. सातारा तालुक्यात बोरगाव, शेंद्रे, डोळेगाव, परळी, संभाजीनगर या मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही परिवर्तन घडून आले. यापैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाने बाजी मारली आहे. इतर गावांमध्ये आ. भोसले व खा. उदयनराजे भोसले यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी परिवर्तन घडवून आणले.
फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर राजे गटाने बाजी मारली, तर विरोधी काँगे्रसच्या गटाकडे १८ ग्रामपंचायती उरल्या आहेत. काँगे्रसचे प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील साखरवाडी ग्रामपंचायत रामराजे गटाने आपल्याकडे खेचून आणली.