पुसेसावळीसह अठरा गावांमधील पथदिवे अन् पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST2021-07-07T04:48:34+5:302021-07-07T04:48:34+5:30
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह अठरा गावांमधील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व काही ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा ...

पुसेसावळीसह अठरा गावांमधील पथदिवे अन् पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळीसह अठरा गावांमधील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व काही ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींच्या थकीत वीजबिल वसुलीपोटी महावितरण कंपनीने ही कारवाई केली आहे. पंधराव्या वित्तमधून ग्रामपंचायतींना मिळालेल्या निधीतून वीजबिले भरावीत, असे सुधारित आदेश आल्याने पेच निर्माण झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, पूर्वीपासून पथदिव्यांची वीजबिले जिल्हा परिषदेकडून भरली जात होती. परंतु, आता १५ व्या वित्त आयोगातून याची तरतूद केली आहे. ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असल्याने ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणी योजनांची वीजबिले वित्त आयोग निधीतून भरावीत, असे सुधारित परिपत्रक निघाल्याने वीजबिलांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर येऊन ठेपली आहे.
आता वीज कंपनी २०१८पासूनची वसुली करत असल्यामुळे बऱ्याच ग्रामपंचायती थकबाकीदार आहेत. त्या बिले भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे थकीत वीजबिलापोटी वीज कंपनीने पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. पुसेसावळी परिसरातील उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या ठिकाणच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे उपकेंद्रातून सांगण्यात आले.
चौकट :
या परिसरातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची वीज महावितरणने तोडली आहे. काही गावांमधील पथदिवे व पाणी पुरवठा विहिरीवर आकडे टाकून सुरू असल्याचे दिसत आहे.