वीजपुरवठा अनियमित; त्यात पाईप फोडण्याचा प्रकार
By Admin | Updated: December 29, 2014 00:05 IST2014-12-28T21:50:00+5:302014-12-29T00:05:05+5:30
वाई तालुका : वेलंग परिसरात पीक नुुकसानीची भीती; विद्युत मोटारींची चोरी

वीजपुरवठा अनियमित; त्यात पाईप फोडण्याचा प्रकार
वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वेलंग व परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याच्या अनियमिततेने हैराण केले असून, त्यात काही विघ्नसंतोषी लोकांकडून विद्युत मोटार, घरातील फ्यूज, इलेक्ट्रिक साहित्य व पाईपलाईन फोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे गहू, शाळू, हरभरा पिकांची भिजवणी करण्यास अडथळे येऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
याबाबत वेलंग येथील ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, या गावसाठी धोम धरणावरून शेती पाण्याच्या योजना आहेत. रब्बी हंगामातील गहू, शाळू, हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी वीजवितरणाच्या अनियमितपणामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. रात्री वीज असल्याने काही शेतकरी पिकांना पाणी रात्रीच्या वेळी देत आहेत. धरण आणि शेती यात अंतर खूप असल्याने काही विघ्नसंतोषी लोक वारंवार मोटार, घरातील फ्यूज, इलेक्ट्रिक साहित्य काढून त्याची व पाईप लाईनची तोडफोड करत आहेत.
त्यामध्येच वीजवितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत नसतो. वारंवार वीज खंडित होत असते. विजेच्या अनियमितपणा यामुळे हैराण झालेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. उपद्रव करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
गावातील नेहरू युवा मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी जागरुक राहून मोटार साहित्य व पाईपलाईन फोडण्याचे कृत्य करणाऱ्यावर पाळत ठेवावी. संशयितांची नावे पोलिसांना देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
-अनिल पाटणे, अध्यक्ष, नेहरू युवा मंडळ, वेलंग