रस्त्यातील खड्ड्यांमुळे घरांनाही हादरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:37 IST2021-09-13T04:37:50+5:302021-09-13T04:37:50+5:30
कोयनानगर : कोयना भागातून जाणाऱ्या गुहाघर-विजापूर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हजारो वाहनांसह आता घरेही खिळखिळी ...

रस्त्यातील खड्ड्यांमुळे घरांनाही हादरे!
कोयनानगर : कोयना भागातून जाणाऱ्या गुहाघर-विजापूर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे हजारो वाहनांसह आता घरेही खिळखिळी होऊ लागली आहेत. आंदोलन आणि निवेदनांकडे दुर्लक्ष करीत खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करून महामार्ग देखभाल विभाग जबाबदारी झटकत असल्याचे दिसते.
कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणातील प्रमुख मार्ग असल्याने सतत अवजड वाहनांची रहदारी या महामार्गावरून सुरूच आहे. मोठी व अवजड वाहने खड्ड्यात आदळताना शेजारील घरांना धक्के बसत आहेत. कोयना भागाला आजवर लाखो भूकंपाचे धक्के बसले आहेत आणि या भागाने ते पचवलेही आहेत. मात्र, खड्डेमय रस्त्यामुळे आजूबाजूच्या घरांना धक्के सहन होत नसल्याची परिस्थिती आहे. चोवीस तास वाहतूक असल्याने धक्क्याची शृंखला सुरूच आहे. लाखो रुपयांची घरे खिळखिळी होऊ लागली आहेत.
कोरोनामुळे आर्थिक स्थिती कोलमडलेल्या स्थानिकांना घरांची काळजी लागली आहे. नवीन घर बांधणे सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे नवीन रस्ता व्हायचा तेव्हा होऊ द्या; पण पहिल्यांदा खड्डे भरा, अशी मागणी होत आहे. गत चार वर्षे झाली तरी रुंदीकरणाच्या कारणाने पाटणपासून घाटमाथ्यापर्यंत रस्त्याची देखभाल थांबली आहे. त्यामुळे जागोजागी खड्डे व पावसाचे पाणी साचत असल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. याकडे महामार्ग विभाग गांभीर्याने पाहणार का, हा प्रश्न आहे.
- चौकट
पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा आंदोलने केली. प्रशासनास निवेदन दिले. मात्र, तरीही या रस्त्याला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटले नाही. अधूनमधून खड्डे भरून मलमपट्टी केली जात आहे. मात्र, काही दिवसांतच ये रे माझ्या मागल्या, अशी अवस्था होत आहे. दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढतच आहे.
- कोट
रस्त्यातील खोल खड्ड्यांमुळे घरांना भेगा पडत असून दिवसापेक्षा रात्रीची वाहने सुसाट असतात. चालकांना खड्डे दिसत नसल्यामुळे वाहन जोरात आदळते. या हादऱ्याने घरांतील भांड्यांसह घरेही थरथरत आहेत. या खड्ड्यांमुळे घरांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महामार्ग विभागाने घेत भरपाई द्यावी.
- रंगराव वाईकर
ग्रामस्थ, येराड
- कोट
पाटण ते घाटमाथ्यादरम्यान रस्त्याच्या कामाचे टेंडर मंजूर झाले आहे. निधीही उपलब्ध झाला आहे. पावसाळा संपताच रुंदीकरण न करता जुन्या रस्त्याचेच डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता
राष्ट्रीय महामार्ग विभाग, पुणे
फोटो : १२केआरडी
कॅप्शन : गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाची पाटणपासून घाटमाथ्यापर्यंत दयनीय अवस्था झाली आहे.