गुजरातच्या मालामुळे बटाट्याचे दर गडगडले...
By Admin | Updated: April 10, 2015 23:51 IST2015-04-10T21:43:09+5:302015-04-10T23:51:57+5:30
व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता : पालेभाज्यांच्या दरावर होणार परिणाम

गुजरातच्या मालामुळे बटाट्याचे दर गडगडले...
सातारा : बाजारात महाराष्ट्रीयन बटाट्याबरोबर गुजराती बटाट्याची ही मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्याने बटाट्याचे दर गडगडले असून, याचा पालेभाज्यांच्या दरावरही परिणाम झाला आहे. यामुळे भाजी मंडई आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील वातावरण हे बटाटा पिकाला अनुकूल असल्याने यावेळी महाराष्ट्रात विक्रमी बटाटा उत्पादन झाला आहे. तर गुजरातहूनही अधिक प्रमाणात बटाटा महाराष्ट्रात विक्रीला आला असल्याने मागणी पेक्षा उत्पादन जास्त असल्याने बटाट्याचे दर उतरले आहे. आठवडा बाजारादिवशी महाराष्ट्रीयन बटाटा दहा किलोला ७० ते १०० रुपये, तर गुजराती बटाट्याला ४० ते ७० रुपये दर मिळाला आहे. हे दर अजून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत टिकून राहतील, अशी शक्यता शेतकरी वर्गाने वर्तवली आहे. यावर्षी खराब वातावरणामुळे राज्यात बटाटा पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे मागील वर्षी १९ ते २० रुपये किलो विक्रीला जाणारा बटाटा आज केवळ सात ते दहा रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. तर याची दुसरी बाजू म्हणजे गुजरातहून आलेला बटाटा हा जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यामुळे हा बटाटा वेळेत विकला जावा म्हणून गुजरात बटाटा स्वस्त मिळत असल्याने याचा फटका महाराष्ट्राच्या बटाट्यावरही झाला आहे. बटाट्याचे दर उतारले आहेत. गेल्या तीन वर्षांत बटाट्याला पहिल्यांदाच एवढा कमी दर मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, साताऱ्यात बहुदा तळेगाव व खटाव तालुक्यातून लोकल बटाट्याचे उत्पादन घेतले जाते; परंतु सध्या खटाव तालुक्यात बटाट्याचे पीक घेणे कमी झाले असून, येथील शेतकरी वर्ग हा उसाच्या पिकाकडे वळाला आहे. त्यामुळे साताऱ्यात लोकल बटाटा हा कमी झाला आहे. (प्रतिनिधी) शीतगृहाचा बटाटा देशभर बटाट्याला मोठी मागणी संपूर्ण देशात आहे. यामुळे हंगामी बटाटा वर्षभर टिकून राहण्यासाठी शीतगृहाचा वापर केला जातो. प्रमुख्याने इंदोर आणि आग्राचा बटाटा हा संपूर्ण देशात वर्षभर आयात केला जातो. या दोन्ही राज्यांत बटाटे शीतगृह ठेवून आयात करतात. मध्यंतरी साताऱ्यात बटाटा हा ३० ते ४० रुपये दर होता, तो बाहेरून म्हणजेच परराज्यातून विक्रीसाठी आला होता. बटाट्याच्या दरावरच पालेभाज्यांचा दर अवलंबून असतात. बटाट्याचे दर उतरले तर भाज्यांचे दरही उतरतात अन् बटाटा तेजीत आला तर पालेभाज्यांचे दरही तेजीत येतात. त्यामुळे संपूर्ण भाजी मंडई दर हे बटाट्यांच्या आवकावर व दरावर अवलंबून असतो. यंदा बटाटा उत्पादन जास्त झाला असल्याने इतर भाजी मंडईचे दरही आता आवाक्यात आहेत.