जिल्ह्यातील ‘गोविंदा’ राजकीय नेत्यांच्या ताब्यात

By Admin | Updated: August 12, 2014 23:16 IST2014-08-12T22:41:21+5:302014-08-12T23:16:37+5:30

दोन पथकांनी खेळ थांबविला : आयोजकांची संख्या अलीकडे भलतीच घटलीय

In the possession of 'Govinda' political leaders in the district | जिल्ह्यातील ‘गोविंदा’ राजकीय नेत्यांच्या ताब्यात

जिल्ह्यातील ‘गोविंदा’ राजकीय नेत्यांच्या ताब्यात

जगदीश कोष्टी -सातारा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी गोविंदा पथकांना चांगले दिवस होते. आठ ते दहा मंडळे सक्रीय होती. मोठ-मोठ्या दहीहंडी फोडत असल्याने त्यांचाच बोलबाला सर्वत्र होता. मात्र, जिल्ह्यातील आयोजकांची संख्या अलीकडे घटली आहे. निवडणुका आल्या तर राजकीय नेतेमंडळी दहीहंडी स्पर्धा भरवतात. आजपर्यंत लहान-लहान बक्षिसांवर समाधान मानावे लागत होते.
दहिहंडीच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आजपर्यंत अनेक मुलांनी जीव गमावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील गोविंदांना केलेला मज्जाव यामुळे गोविंदा पथक सध्या चर्चेत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील आयोजिकांच्या निरूत्साहामुळे अनेक गोविंदा पथकांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. त्यामुळे अनेक नामवंत पथकांनी यापूर्वीच सहभाग घेणे बंद केले आहे.
राज्यात कोठेही वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहिहंडी बांधू नये, असे पत्रक राज्य सरकारने काढावे; तसेच १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीतील सहभागावर बंदी घालावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले आहे.
अठरा वर्षांखालील बाल गोविंदांना यापुढे दहीहंडीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. यामुळे संभाव्य अपघात टळून होणारे नुकसान टाळता येणार आहे. मात्र, अठरा वर्षांपुढील गोविंदा घेऊन दहीहंडी खेळायची कशी, असा प्रश्न गोविंदा पथकांसमोर पडला आहे. दहीहंडी हा साहसी खेळ आहे. यामध्ये एकावर एक थर लावले जातात. हा खेळ खेळत असताना मनोऱ्यावर पाण्याचा मारा केला जातो. त्यामुळे मनोऱ्यांची रचना करताना खालच्या दोन थरांमध्ये प्रौढ व्यक्ती असतात. त्यानंतर वरच्या थरांसाठी कमी वजनांची मुलं वापरली जातात. सर्वांत उंचीवरचा गोविंदा साधारणत: १० ते १५ किलोचा असतो. १८ वर्षांवरील गोविंदा वापरल्यास हालचाली करण्यास अडचणी येतात.
जावळी तालुक्यातील भैरवनाथ गोविंदा पथक, जवळवाडी हे पथक आठ ते दहा वर्षांपासून जिल्ह्यात नावारुपास आले आहे. सातारा, कोरेगाव येथील एक लाखांची दहीहंडी फोडण्याचा मान या मंडळाने मिळविला होता. या मंडळाकडे ८० ते १०० गोविंदा होते. त्यांच्याकडून दोन महिन्यांपूर्वीपासून सराव करुन घेतला जात होता. मुलांना चहा-नाष्टा, टी-शर्ट, येण्या-जाण्याचा खर्च वाढत होता. मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा होत नसल्याने खर्चही निघत नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षीपासून हे पथक बंद केले आहे.

Web Title: In the possession of 'Govinda' political leaders in the district