कुसूर विभागात दारूविक्री फोफावली
By Admin | Updated: July 21, 2014 23:08 IST2014-07-21T22:57:30+5:302014-07-21T23:08:16+5:30
ंदारूचे बॉक्स घरपोच : माल देण्या-घेण्यावरून वाद

कुसूर विभागात दारूविक्री फोफावली
कुसूर : कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गावरील प्रत्येक बसथांब्यावर सध्या अवैध दारूविक्री बोकाळली आहे़ या किरकोळ दारू विक्रेत्यांचे दारूची बॉक्स पोहोचविणाऱ्या बड्या विक्रेत्यांमध्ये माल देण्या-घेण्यावरून दररोज वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावरील प्रत्येक गावात अवैधरीत्या दारूविक्री फोफावत आहे़ मनमानी पैशात दारूच्या बाटल्यांची विक्री होत असल्याने बक्कळ पैशाच्या हव्यासापोटी किरकोळ विक्रेत्यांची येथे दिवसेंदिवस वाढ होत आहे़ या विक्रेत्यांना व्हाईट कॉलरवाल्यांचा वरदहस्त असल्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रतिष्ठेचा बनत आहे़ या विक्रेत्यांना कोणाचीच भीती नसल्याचे दिसून येते़ तंबाखू-गुटख्याप्रमाणे दारूची राजरोस विक्री होत आहे़ मुळातच हा धंदा अवैध असल्यामुळे मनमानी पैसे घेतले तरी तक्रार कोणाकडे आणि कशी करावी, या विवंचनेत मद्यपी गप्प बसणे पसंत करत आहेत़ त्यामुळे मालामाल झालेल्या विक्रेत्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही़
किरकोळ दारू विक्रेत्यांना घरपोच सेवा देणाऱ्या बड्या विक्रेत्यांचीही संख्या कमी होत नाही. आलिशान गाड्यांमधून वाहतूक करून दारूचे बॉक्स विक्रेत्यांना घरपोच दिले जात आहेत़ एका बॉक्स मागे २०० ते २५० रुपये मिळत असल्याने या विक्रेत्यांमध्येही वाढ होत आहे़ परिणामी बड्या विक्रेत्यांनी या किरकोळ विक्रेत्यांची विभागवार वाटणीच करून घेतल्याचे दिसते़ काही विके्रते कमी पैशाचे आमिष दाखवून किरकोळ विक्रेत्यांना आकर्षित करत आहेत. याचे वादात रूपांतर होत असून, वादाचे प्रकार नित्याचे बनले आहेत़ (वार्ताहर)