हिंगणगाव मार्गावरील चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:46 IST2021-09-17T04:46:13+5:302021-09-17T04:46:13+5:30
आदर्की : आदर्की बुद्रुक-हिंगणगाव रस्त्यावर चार किलोमीटर अंतरात १९७२ पासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे वाढले ...

हिंगणगाव मार्गावरील चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था
आदर्की : आदर्की बुद्रुक-हिंगणगाव रस्त्यावर चार किलोमीटर अंतरात १९७२ पासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडपे वाढले आहेत. यामुळे हा रस्ता नव्हे जंगलातून जात असल्याचा भास प्रवाशांना होत आहे.
सातारा-फलटण रस्त्यावरून आदर्की बुद्रुक ते हिंगणगाव रस्ता सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर १९७२ मध्ये १२ ते १६ फूट रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. दोन्ही गावांतील ग्रामस्थ फलटण, सातारा, लोणंद, पुणे येथे जाण्यासाठी रस्त्याचा वापर होत होता. त्यानंतर आदर्की व हिंगणगाव येथील ओढ्यावर पूल व अन्य तीन ठिकाणी छोटे बांधले. हिंगणगाव ते पांढरे वस्तीपर्यंत सात-आठ वर्षे डांबरीकरण झाले. आदर्की बुद्रुक बाजूने स्मशानभूमीपर्यंत दोन वेळा डांबरीकरण करण्यात आले. त्याचे पुढे दोनशे मीटर डांबरीकरण केले, पण साईडपट्ट्या भरल्या नसल्याने रस्ता खराब झाला आहे. मधील चार किलोमीटर रस्त्यावर १९७२ पासून निधी खर्च न केल्याने त्यावरील पूर्ण खडी निघून गेल्याने रस्त्यावर चालणेही कठीण जात आहे.
दोन्ही बाजूने झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यांची कमान झाल्याने चारचाकी वाहनासाठी रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. पुढील महिन्यात ऊस तोडणी सुरू होणार आहे. रस्ता नादुरुस्त असल्याने ऊस तोडणीस उशीर होणार आहे. संबंधित विभागाने अडथळा ठरणारी झुडपे काढून रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.
चौकट :
आदर्की बुद्रुक-हिंगणगाव रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असल्याने या रस्त्यावर निधी उपलब्ध होत नाही. तरी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यास निधी उपलब्ध होईल. या रस्त्याचा सर्व्हे सहा महिन्यांपूर्वी झाला आहे. पुढे काहीही कारवाई झाली नाही.
फोटो १६हिंगणगाव रोड
आदर्की बुद्रुक-हिंगणगाव रस्त्यावर झुडपांची कमान झाल्यास वाहतुकीस अडथळा ठरत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)