कवठेत सापडले खवले मांजर
By Admin | Updated: June 8, 2015 00:51 IST2015-06-07T23:25:13+5:302015-06-08T00:51:58+5:30
बघ्यांची गर्दी : ओढ्यालगतच्या एक घरात उकरली जमीन

कवठेत सापडले खवले मांजर
कवठे : कवठे, ता. वाई येथील दीपक जगन्नाथ गुरव यांच्या घरात रविवारी पहाटे खवले मांजर सापडले. डोंगरी भागात झाडाझुडपांत आढळणारे दुर्मिळ असे खवले मांजर लोकवस्तीत आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. खवले मांजर पाहण्यासाठी कवठेकरांनी एकच गर्दी केली होती.दीपक गुरव यांचे घर गावच्या ओढ्यालगत आहे. रविवारी मध्यरात्री खवले मांजर दीपक गुरव यांच्या घरात घुसले. पहाटेच्या दरम्यान ते घरात लपण्यासाठी जमीन उकरू लागले असता त्या आवाजाने दीपक गुरव यांना जाग आली. त्यांनी हटकल्यानंतर खवले मांजर मेल्यासारखे निपचित पडून राहिल्याने गुरव यांनी त्याला पोत्यात भरून गायीच्या गोठ्यात ठेवले. काही वेळाने मांजराने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु अशक्तपणामुळे त्याला पळता येत नव्हते. त्यामुळे गुरव यांनी त्याला व्यवस्थित पोत्यात ठेवून वन विभागाचे अधिकारी कांबळे यांना मोबाईलवरून संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
साधारणत: मुंगसासारखा दिसणारा हा प्राणी मांजर या प्रवर्गात मोडत असून मुंग्या व किडे हे याचे प्रामुख्याने
खाद्य असते. या मांजराच्या डोक्याचा, पाठीचा भाग व पायांवर धारदार खवल्याने झाकलेला असून पोटावर राठ केस आहेत.
स्वसंक्षणासाठी खवले मांजर शरीराचे वेटोळे करून आपल्या शरीरावरील धारदार खवले उंचावते. असे केल्याने खवल्याच्या धारदार कडा बाहेरच्या बाजूने रोखल्या जातात. खवले टणक असल्याने व थोडासा विचित्र असा हा प्राणी दिसत असल्याने कोणीही याच्या जवळ जात नव्हते. त्यास दीपक गुरव व संजय लोखडे यांनी पकडले. (वार्ताहर)
गावात दुसऱ्यांदा मिळाले दर्शन
खवले मांजर हे आफ्रिका व आशिया येथील उष्ण कटिबंधामध्ये आढळते. कवठे गावामध्ये खवले मांजर सापडण्याची ही दुसरी वेळ असून शशिकांत पोळ यांच्या घराशेजारी पहिले खवले मांजर सापडले होते.