तरुणींच्या मदतीला गरीबरथ धावला
By Admin | Updated: February 6, 2015 00:40 IST2015-02-05T20:20:25+5:302015-02-06T00:40:27+5:30
महिलांमध्येही उत्साह : कळंबेत पेढे वाटून साजरा केला आनंद--लोकमतचा इफेक्ट

तरुणींच्या मदतीला गरीबरथ धावला
किडगाव : कळंबे, ता. सातारा येथील महाविद्यालयीन युवतींना एसटीअभावी चालत यावे लागत होते. आडरानात अडवून त्यातील त्रास काहीना दिला जात होता. त्यामुळे ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने कळंबेला एसटी सेवा सुरू केली आहे. याचा आनंद महिला व तरुणींनी पेढे वाटून साजरा केला.कळंबेमध्ये तीन गाड्या येत होत्या. मात्र, सकाळी महाविद्यालयाला, नोकरी-व्यवसायासाठी युवक-युवती, लोक वेळेवर पोहोचत नव्हते. त्यासाठी दोन-तीन किलोमीटरचा प्रवास चालत करावा लागत होता. वेण्णा नदी पार करून नुने शाळा येथे जावे लागत; मात्र मध्यंतरी वेण्णानदी ते नुणे शाळा या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने सलग दोन-तीन दिवस युवती व महिलांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या समस्येकडे ‘लोकमत’ने गंभीर भूमिका घेत विशेष मोहीम राबविली. गावात एसटी बस यावी म्हणून प्रयत्नही केला. त्यामुळेच सकाळी साडेसहाला युवतीसाठी ही बसगाडी नुकतीच सुरू झाली. यामुळे तीन नवीन बसगाड्या सुरू झाल्या आहेत. पूर्वीच्या तीन असा सहा गाड्या आता धावत आहेत.
नवीन बससेवेचा प्रारंभ जयसिंगराव मस्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला. यावेळी युवती-महिलांसाठी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तर सर्वांनी यावेळी एक शपथ घेतली. यापुढे आम्ही गावातून एसटी बसनेच प्रवास करून नुणे शाळेला आम्ही जाणार आहोत. एसटीमुळे चांगलीच सोय झाली आहे.यावेळी रमेश इंदलकर, संभाजी इंदलकर, सरपंच प्रकाश चिंचकर, उपसरपंच अनिल लावंघरे, हणमंत इंदलकर, संतोष लावंघरे, हणमंत इंदलकर, विकास इंदलकर यांनी विशेष प्रयत्न केले. (वार्ताहर)