पूजा चव्हाण प्रकरणी संवेदनशीलपणे निर्णय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:28+5:302021-02-18T05:14:28+5:30

सातारा : ‘माणूस दोषी आहे का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच; पण राजकीय व्यवस्थेने पूजा चव्हाण प्रकरणात संवेदनशीलपणे निर्णय ...

Pooja Chavan case should be decided sensitively | पूजा चव्हाण प्रकरणी संवेदनशीलपणे निर्णय हवा

पूजा चव्हाण प्रकरणी संवेदनशीलपणे निर्णय हवा

सातारा : ‘माणूस दोषी आहे का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच; पण राजकीय व्यवस्थेने पूजा चव्हाण प्रकरणात संवेदनशीलपणे निर्णय घेणे गरजेचे आहे,’ असे मत भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलेल, असा दावाही त्यांनी केला.

सातारा येथे पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले, तर सांगलीला जात असताना तावडे हे साताऱ्यात काहीवेळ थांबले होते. यावेळी जिल्हा भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सुनील कालेकर यांच्यासह किशोर गोडबोले, मनीषा पांडे, रिना भणगे, विक्रांत भोसले आदी उपस्थित होते.

विनोद तावडे यांनी सातारा शहरातील पक्षकार्याची माहिती घेतली. पक्ष संघटन वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर बुथ संपर्क अभियान चांगल्या पद्धतीने पूर्ण करून बुथ कार्यकर्ता मजबूत करण्याचा कानमंत्रही दिला.

दरम्यान, तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांना एखादा प्रदेश मिळतो तसा मला हरियाणा मिळाला आहे. आता भाजप आणि आमच्यासमोर प्रमुख टार्गेट आहे ते पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकणं. खऱ्या अर्थाने आम्ही तिथे मोठी ताकद लावली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही १२१ तर तृणमूल काँग्रेस १६७ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होते. हा फरक कसा भरून काढता येईल, यावर आमचे काम सुरू आहे. यावेळी बंगालमध्ये भाजपचे कमळ फुललेले दिसेल.

पूजा चव्हाण प्रकरणात मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही, हा दोष सरकारचा का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर तावडे म्हणाले, ‘अशा प्रकरणात राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला पाहिजे. संवेदनशीलपणे निर्णय घेणे गरजेचे आहे, ते या सरकारने केले पाहिजे, असे सामान्य जनतेला वाटते. माणूस दोषी का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच.’

पुस्तकांचं गाव भिलारविषयी विनोद तावडे म्हणाले, ‘पुस्तकांचं गाव हे सातारा तसेच महाराष्ट्राचं भूषण आहे. त्या गावासंबंधी अ‍ॅक्टिव्हिटी व्हायला पाहिजेत, त्या झाल्या नाहीत. मला अपेक्षा आणि आशा आहे की, कोरोनानंतर आता पुस्तकांचं गाव पुन्हा जोराने सुरू होईल. शासनही त्याला नक्कीच मदत करेल.’

चौकट :

जिल्हा बँकेबाबत चंद्रकांतदादा, उदयनराजे ठरवतील...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप आपले पॅनल उभा करणार का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर तावडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले हेच यावर निर्णय घेतील, असे स्पष्टपणे सांगितले.

................................................

Web Title: Pooja Chavan case should be decided sensitively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.