तलावातील गाळ ग्रामस्थांच्या जिवावर
By Admin | Updated: September 20, 2014 00:35 IST2014-09-19T22:37:54+5:302014-09-20T00:35:11+5:30
ढेबेवाडी विभाग : शाळकरी मुलांच्या मृत्युनंतरही प्रशासन ढिम्म, उपाययोजना करण्याची गरज

तलावातील गाळ ग्रामस्थांच्या जिवावर
सणबूर : नाईकबा-बनपुरी, ता़ पाटण येथील पाझर तलावात बुडून काही दिवसांपूर्वी दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाला़ या घटनेमुळे ढेबेवाडी खोरे चांगलेच हादरले़ यापूर्वीही पाझर तलावाच्या गाळात रुतल्याने बुडून काहीजणांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे तलावातील गाळ जीवावर उठल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे़ अजून किती बळी गेल्यावर शासनाचे डोळे उघडणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे़
विभागातील वाल्मीक पठारावरील दरी, खोऱ्यात व माळरानावर ठिकठिकाणी शासनाच्या कृषी व वन विभागाने वनतळी, पाझर तलाव बांधले आहेत़ भूगर्भात पाणीसाठा कायम राहावा व वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने शासनाने हे तलाव बांधले आहेत़ शासनाचा हेतू चांगला आहे़ मात्र, अनेक वर्षे या पाझर तलाव अथवा वनतळ्यांची डागडुजी अथवा साफसफाई करून वाहून आलेला गाळ न काढल्यामुळे हा साठलेला गाळ आता अनेकांच्या जीवावर उठू लागला आहे़
चार वर्षांपूर्वी ऐन दिवाळीच्या सणालाच विभागातील रुवले-नेहरुवाडी येथे तलावात पोहण्यास गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा वाल्मीक पठारावरील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला होता़ मात्र, शासनाच्या संबंधित विभागाने या घटनेचा कोणताही बोध घेतला नाही़ अशातच काही दिवसांपूर्वी या चार वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली़ नाईकबानगर येथील दोन शाळकरी मुलांचा पाझर तलावातील गाळात बुडून मृत्यू झाला़
प्रसाद भालेकर व भास्कर माने अशी त्या शाळकरी मुलांची नावे असून, हे दोघेही नाईकबा-बनपुरी येथील होते़ या दोन्ही घटना उत्सवाच्या कालावधीत घडल्याने विभागात नव्हे तर संपूर्ण पाटण तालुक्यात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे़ या दोन्ही कुटुंबातील व्यक्तींचा आक्रोश आणि किंकाळ्या हृदय हेलावून टाकणाऱ्या होत्या़ त्यामुळे अनेकांना त्यांचा आक्रोश पाहून अश्रू अनावर होत होते़ या घटनेमुळे गावच्या बाजूला असणारा पाझर तलाव हाच चिंतेचा विषय बनू लागला असून, अजून किती जणांचे बळी गेल्यानंतर शासनाला जाग येणार? असा प्रश्न केला जात आहे़ संबंधितांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या योजनेतून शासनाने पाझर तलाव बांधले़ मात्र, पाझर तलावातील गाळ काढून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे़ तलावांच्या डागडुजीनंतरच अशा दुर्दैवी घटनांना आळा बसेल़
- दीपक महाडिक,
ग्रामस्थ, नाईकबा-बनपुरी