शिक्षक सोसायटीसाठी उद्या मतदान!
By Admin | Updated: April 3, 2015 00:36 IST2015-04-02T23:22:41+5:302015-04-03T00:36:53+5:30
कऱ्हाड-पाटण शिक्षक सोसायटी : ‘सद्गुरू’ विरुद्ध ‘परिवर्तन’ पॅनेलमध्ये लढत

शिक्षक सोसायटीसाठी उद्या मतदान!
कऱ्हाड : कऱ्हाड-पाटण तालुक्यांतील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या सोसायटीची ४ मार्चला निवडणूक होत आहे. सत्ताधारी ‘सद्गुरू’ विरुद्ध विरोधकांनी ‘परिवर्तन’ पॅनेल रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.शिक्षक सोसायटीत सध्या शिक्षक नेते संभाजीराव थोरात गटाची सत्ता आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली महेंद्र जानुगडे, सदाशिव कदम यांनी सद्गुरू शिक्षक संघ असे पॅनेल उभे केले आहे. तर शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटाच्या बाजीराव शेटे व सहकाऱ्यांनी शिक्षक समितीच्या अंकुश नांगरे व सहकाऱ्यांशी चर्चा करून एकत्रित परिवर्तन पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार पाहायला मिळतेय.प्रस्थापितांना शह देण्यासाठी एकास एक उमेदवार उभा करायला पाहिजे, हे विरोधकांनी जाणले. मग शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे ध्यानात घेऊन शिवाजीराव पाटील शिक्षक संघ व शिक्षक समिती यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही गटांने शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना यांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगत कऱ्हाडात एक ‘परिवर्तन’ मेळावाही घेतला; पण उमेदवारी निश्चितीनंतर एकत्र येऊ पाहणाऱ्यांच्यातच ‘परिवर्तन’ होताना दिसू लागले.
अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी पाटणच्या शिक्षक समितीने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय मात्र, शेवटच्या दोन दिवसात हे समितीचेच पदाधिकारी संघाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दितस आहेत. तसेच कऱ्हाड तालुक्यातील समितीतील एक नाराज गटही सद्गुरू पॅनेलच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. दोंदे गटाच्या शिक्षकांनी सत्ताधाऱ्यांच्याच प्रचाराचा ‘श्री गणेशा’ केलाय. वास्तविक सातारा जिल्हा शिक्षक बँक सध्या शिक्षक समितीच्या ताब्यात आहे. अन् विशेष म्हणजे, कऱ्हाड तालुक्यात त्याचे दोन विद्यमान संचालक आहेत. त्यामुळे या सोसायटी निवडणुकीत समितीचे स्वतंत्र पॅनेल उभे राहायला हरकत नव्हते; पण तसे का घडले
नाही, याबाबतही उलट सुलट चर्चा आहेत.
त्याही पुढे जाऊन प्रस्थापितांविरोधात नाराजाची मोट बांधायलाही पूर्ण यश आलंय, असं दिसत नसल्याची चर्चा शिक्षकांच्यातच आहे. (प्रतिनिधी)