जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान
By Admin | Updated: May 5, 2015 00:49 IST2015-05-05T00:45:43+5:302015-05-05T00:49:45+5:30
प्रशासन सज्ज : २८ उमेदवारांचे भविष्य होणार पेटीबंद

जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी ११ तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. २८ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.
दरम्यान, ११ मतदान केंद्रांवर ८५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. २० कर्मचारी राखीव असणार आहेत. ११ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांच्या उपस्थितीत सोमवारी येथील भूविकास बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना मतपेट्या, मतपत्रिका व इतर निवडणूक साहित्याचे वाटप केल्यानंतर हे कर्मचारी नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये रवाना झाले.
या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेल विरुद्ध परिवर्तन पॅनेल ही दोन पॅनेल समोरासमोर ठाकले असून, नऊ अपक्षांनी दंड थोपटले आहेत. सातारा, खटाव, पाटण, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघांत व खरेदी-विक्री संघ, औद्योगिक विणकर व मजूर, गृहनिर्माण हे चार मतदारसंघ बिनविरोध करून राष्ट्रवादीने निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
महिला राखीव, कोरेगाव सोसायटी, कृषी प्रक्रिया या तीन मतदारसंघांतही राष्ट्रवादीने बंडखोरांना थोपविण्यात यश मिळविले असल्याने या मतदारसंघातील निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता उरलेली आहे. (प्रतिनिधी)