धर्माच्या नावावर एकमेकांना भडकविण्याचे राजकारण
By Admin | Updated: August 22, 2015 00:54 IST2015-08-22T00:54:00+5:302015-08-22T00:54:00+5:30
राम पुनियानी : अभिवादन सभेत मत व्यक्त

धर्माच्या नावावर एकमेकांना भडकविण्याचे राजकारण
सातारा : ‘जगात कोणत्याही एकाच विशिष्ट धर्मात आतंकवादी जन्माला येत नाही. जगात प्रामुख्याने भारतातील राष्ट्रीय नेत्यांच्या हत्या, या एकाच धर्मातील व्यक्तीने केलेल्या दिसून येणार नाहीत, त्यामुळे या देशात धर्माच्या नावावर नागरिकांना एकमेकांच्या विरोधात भडकविण्याचे राजकारण सुरू आहे,’ असे मत डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.
कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. इरफान इंजिनियर होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, विजय मांडके व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘सांस्कृतिक दहशतवादाचे आव्हान’ या विषयावर पुढे बोलताना डॉ. राम पुनियानी म्हणाले, ‘देशात सध्या सांप्रदायिक राजकारण सुरू झाले आहे. देशातील केवळ ३१ टक्के मते घेऊन केंद्रात सत्तेत आलेले मंत्री धार्मिक भाषा बोलू लागले आहेत. राज्यघटनेच्या जागी भगवद् गीता आणण्याचा मानस केंद्रीयमंत्री व्यक्त करू लागले आहेत. हे दहशतीचे नवे रूप समोर येताना दिसून येत आहे. वास्तविक या देशात धर्माच्या नावावर हिंसा ही खऱ्या अर्थाने इंग्रजानंतर सुरू झाली आहे. इंग्रजांपूर्वी या देशावर कोणा एका राजाचे राज्य नव्हते. छ. शिवाजी महाराज वगळता सर्व राजांची लढाई ही केवळ संपत्तीसाठी होती. शिवाजी महाराज यांची लढाई ही केवळ रयतेच्या कल्याणासाठी होती; परंतु काही लोकांनी चुकीचा इतिहास सांगून देशातील नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला.
पूर्वी कोणत्याही धर्मातील संत हे नागरिकांना जोडण्याचे काम करीत होते. गौतम बुद्धांनी समतेचा संदेश दिला; परंतु त्यावेळी धर्मगुरूंनी आक्रमण केले आणि समाजात अज्ञान पसरविण्याचे काम सुरू केले. देशातील नागरिकांनी वैज्ञानिक विचार करूच नये, अशी त्या धर्मगुरूंची इच्छा होती व आहे. देशातील राजकीय पक्षांचे अजेंडे पाहिले तर काही पक्षांना धर्मावर आधारित राजकारण करायचे आहेत व तर काहीना वैज्ञानिक विचारांवर राजकारण करायचे आहेत. या देशाला धर्मावर आधारित राजकारण नव्हे, तर वैज्ञानिक व समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित राजकारण अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणासाठी धर्माचे कपडे घालणाऱ्यांचे समर्थन न करता या देशातील सर्व धर्मातील ऐक्य अबाधित ठेवणे गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले. यावेळी अॅड. इरफान इंजिनियर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध पुरोगामी संघटनेतील कार्यकर्ते तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)