‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत पोलीस --‘पर्ल्स’रेट धोक्यात!
By Admin | Updated: November 6, 2014 22:59 IST2014-11-06T22:14:35+5:302014-11-06T22:59:32+5:30
एकत्र येण्याचे आवाहन

‘पर्ल्स’ गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत पोलीस --‘पर्ल्स’रेट धोक्यात!
सातारा : सातारा जिल्ह्यांमध्ये पर्ल्स कंपनीने मोठे जाळे विणले होते. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या कंपनीमध्ये अनेक नागरिकांनी केली आहे. मात्र, कंपनी सुरू होईल आणि आमचे पैसे परत मिळतील, या आशेवर गुंतवणूकदार बसले आहेत तर पोलीस तक्रारदाराच्या प्रतीक्षेत आहेत.संपूर्ण राज्यात ‘पर्ल्स’ ला टोळे लागले आहेत. ‘सीबीआय’ने या कंपनीची बँक खाती सील केली आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या कंपनीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विशेष म्हणजे, ‘पर्ल्स’च्या गुंतवणुकीमध्ये सातारा जिल्हा हा सर्वाधिक पुढे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरापासून खेडोपाड्यापर्यंत सुमारे ३५ हजार एजंट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील राधिका रस्त्यावर ‘पर्ल्स’चे कार्यालय आहे. फलटण, माण, खंडाळा या तालुक्यांतील लोकांनी ‘पर्ल्स’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, मोठी गुंतवणूक करूनही अद्यापही गुंतवणूकदार मूग गिळून गप्प का आहेत, याचे पोलिसांना आश्चर्य वाटत आहे. (प्रतिनिधी)
एकत्र येण्याचे आवाहन
ज्या लोकांनी ‘पर्ल्स’मध्ये पैसे गुंतविले आहेत, त्यांनी एकत्र येऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जेणेकरून या पर्ल्समध्ये नेमके किती पैसे गुंतवले आहेत, याची माहिती समजेल आणि त्यामधील व्यवहार पारदर्शी झाले आहेत की नाही, हे समजू शकेल, असे पोेलिसांचे म्हणणे आहे.