किल्ले मच्छिंद्रगड येथे बैलगाडी शर्यती पोलिसांनी रोखल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:13+5:302021-04-04T04:41:13+5:30
कऱ्हाड : रंगपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतींवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांना ...

किल्ले मच्छिंद्रगड येथे बैलगाडी शर्यती पोलिसांनी रोखल्या
कऱ्हाड : रंगपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतींवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांना पाहताच अनेक गाडीवान बैलांसह पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कऱ्हाड आणि वाळवा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी सय्यदनगरमध्ये शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किल्ले मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी सय्यदनगर येथे रंगपंचमीनिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील यांना मिळाली. त्यांनी याबाबतची माहिती कऱ्हाड ग्रामीण पोलिसांना देऊन, त्या ठिकाणी कारवाई करण्याची सूचना दिली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, हवालदार विकास सपकाळ, हवालदार जाधव व एक्के यांचे पथक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी सय्यदनगरमध्ये बैलगाड्या शर्यती सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलिसांना पाहताच, काही गाडीवान बैलांसह तेथून पसार झाले, तर दोन छकडे व इतर साहित्य पोलिसांच्या हाताला लागले. पोलिसांनी ते जप्त केले, तसेच या प्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, किल्ले मच्छिंद्रगड सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने हा गुन्हा इस्लामपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.