पोलिसांचा ‘प्रिन्स’ दिसताच बसस्थानक स्तब्ध
By Admin | Updated: August 1, 2014 23:21 IST2014-08-01T22:17:46+5:302014-08-01T23:21:50+5:30
उंब्रज : बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी

पोलिसांचा ‘प्रिन्स’ दिसताच बसस्थानक स्तब्ध
उंब्रज : उंब्रज बसस्थानक... नेहमीप्रमाणेच प्रवाशांची गर्दी... अचानक पोलिसांची गाडी येऊन थांबली... त्यातून पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच बॉम्बशोधक पथकातील श्वान ‘प्रिन्स’ खाली उतरले. बसस्थानकात प्रिन्स काहीतरी शोधत होता, हे पाहून सारेच आवाक् झाले. काही तरी विचित्र घडत असल्याने पाहून बसस्थानक स्तब्ध झाले; पण ही नेहमीप्रमाणे तपासणी झाल्याचे समजल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडला.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज बसस्थानक सातारा-कऱ्हाड मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी आहे. याठिकाणी बहुतांश गाड्यांना थांबा असल्याने अनेक प्रवासी या ठिकाणी चहा-अल्पोहारासाठी थांबत असतात. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्याचप्रमाणे शुक्रवारीही गर्दी होती.सातारा जिल्हा पोलीस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथक शुक्रवारी उंब्रज बसस्थानकात धडकले. या पथकाने बसस्थानक, बाजारपेठ परिसरातला भेट देऊन श्वान ‘प्रिन्स’च्या मदतीने परिसराची पाहणी केली. यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशामुळे सातारा बॉम्बशोधक व नाशक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक एस. टी. शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल हणमंत शिवणकर, मनोहर सुर्वे, महेश पवार, लियाकत पिंजारे, श्वान ‘प्रिन्स’ यांनी पाहणी केली.श्वान ‘प्रिन्स’ व विविध साहित्य घेऊन हे पथक बसस्थानक परिसराचा कोपरान्कोपरा पिंजून काढला. यामुळे अचानक शोधमोहीम सुरू झाल्याची बातमी परिसरात पसरली. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. परंतु, काही वेळातच ‘तपासणी सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात यास्वरूपाची तपासणी करणार आहे,’ अशी पोलिसांनी सांगितल्यावर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना बेवारस वस्तू आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यांना संपर्क साधावा, पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करेल. त्यामुळे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक एस. टी. शिंदे यांनी केले आहे.