आक्षेपार्ह ‘पोस्ट’ रोखण्यासाठी पोलिसांचा ‘सोशल’ जागर !

By Admin | Updated: September 2, 2014 23:44 IST2014-09-02T23:44:27+5:302014-09-02T23:44:27+5:30

स्मार्टफोनधारकांनो सावध : प्रत्येक मोबाईलपर्यंत पोहोचले फायदे-तोटे

Police 'social' jagger to prevent offensive 'post' | आक्षेपार्ह ‘पोस्ट’ रोखण्यासाठी पोलिसांचा ‘सोशल’ जागर !

आक्षेपार्ह ‘पोस्ट’ रोखण्यासाठी पोलिसांचा ‘सोशल’ जागर !

कऱ्हाड : ‘सोशल मीडिया’वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह ‘पोस्ट’ रोखण्यासाठी पोलिसांनीच आता ‘सोशल’ जागर सुरू केलाय. गैरवापर टाळण्याचे आवाहन करण्याबरोबरच उचापतखोरांना कायदेशीर समज देणारी एक ‘पोस्ट’ पोलिसांनी स्वत: प्रसारित केलीय. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमधून प्रसारित झालेली ही ‘पोस्ट’ सध्या प्रत्येक स्मार्ट फोनवर फिरतेय.
काही महिन्यांपूर्वी ‘सोशल मीडिया’वरील आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रांवरून मोठे वादंग निर्माण झाले होते. प्रत्येक शहरात अशांतता निर्माण झाली होती. मोर्चा, आंदोलने आणि बंदचा फटका सर्वसामान्यांना बसलाच; पण या प्रकाराने पोलीस दलावरील ताण प्रचंड वाढला. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांना चोवीस तास ‘अलर्ट’ राहावे लागले. या प्रकारानंतर सोशल मीडियाबाबत जागृती करण्याची मोहीमच पोलिसांनी हाती घेतलीय. आत्तापर्यंत याबाबत विविध बैठकांतून पोलिसांनी जनजागृती केली; पण त्याचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील धिंगाणा रोखण्यासाठी आता पोलिसांनीही सोशल मीडियाचाच आधार घेतलाय.
कऱ्हाडच्या पोलिसांनी सोशल मीडियाचा गैरवापर कसा होतो, तो टाळण्यासाठी काय करावे व गैरवापर केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत एक आकर्षक पोस्ट तयार केलीय.
कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडून ती पोस्ट पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मोबाईलला पाठविण्यात आली. तसेच ती त्यांच्या संपर्कातील इतर ‘नेटिझन्स’ना पाठविण्याचीही सूचना करण्यात आली. सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी ती पोस्ट मोबाईलच्या माध्यमातून संपर्कातील व्यक्तींना पाठविली आणि सध्या कऱ्हाड शहरासह तालुक्यातील प्रत्येक स्मार्ट फोनपर्यंत ती पोस्ट पोहोचलीय. पोलिसांची ही ‘आयडिया’ सोशल मीडियाबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्याचा गैरवापर टाळण्यासाठीही प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Police 'social' jagger to prevent offensive 'post'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.