कोळकीमधील पोलीस चौकी मंजूर असून, नेमके कुठं अडकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:03+5:302021-09-13T04:38:03+5:30
कोळकी : कोळकी येथील पोलीस दूरक्षेत्र मंजूर झाले असून, मग पुढे कुठे गंगेत घोडं न्हालं लोकांना समजलंच नाही. फलटण ...

कोळकीमधील पोलीस चौकी मंजूर असून, नेमके कुठं अडकली!
कोळकी : कोळकी येथील पोलीस दूरक्षेत्र मंजूर झाले असून, मग पुढे कुठे गंगेत घोडं न्हालं लोकांना समजलंच नाही. फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेली कोळकी येथे अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यावसायिक, तसेच नोकरदारांचे वास्तव्य असलेल्या गावामध्ये या ठिकाणी अनेक अवैध धंदेवाले, प्लाॅटिंगमुळे दलाल, एजंट, गावगुंडांनी आपले पाय रोवले. यामुळे अनेकांना स्वत:चे प्लाॅट, जमिनी, पैसे सोडून द्यावे लागले, तर काहींना आपल्या प्राणाला मुकावे लागले.
कोळकी येथे पोलीस दूरक्षेत्र व्हावे, यासाठी अनेकदा ग्रामपंचायतीमार्फत ठराव करून फलटण शहर पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षकांना वेळोवेळी ठराव देण्यात आले; परंतु तेवढ्यापुरते आश्वासन मिळते. नंतर नवीन अधिकारी आला की फाईल पुन्हा धूळखात पडते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व कोळकीतील समर्थकांसमवेत कोळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील जागेची पाहणी करून जागेस हिरवा कंदील दाखविला; पण पुढे माशी कुठे शिंकली, हे अद्याप समजले नाही.
या पोलीस दूरक्षेत्रामुळे वाटमारी, अपघात, श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर मार्ग, फलटण-दहिवडी, मोगराळे मार्ग व रात्रंदिवस अवजड वाहनांची असणारी रहदारी याबरोबर कोळकीसह परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होऊ शकते. नियोजित जागेवरील पोलीस दूरक्षेत्र बांधून होईपर्यंत ते शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या व कित्येकवर्षे वापराविना पडून असलेल्या बचतगट उत्पादित मालविक्री केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
कोट..
कोळकी येथील नियोजित पोलीस चौकीसाठी जागा पसंत आहे; परंतु ही जागा ग्रामपंचायतीने बक्षीसपत्र करून देणे गरजेचे आहे. जागा बक्षीसपत्र करून दिल्यास त्वरित पोलीस चौकीचे काम सुुरू करण्यात अडचण नाही.
-तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधीक्षक
कोट...
कोळकी येथे पोलीस दूरक्षेत्राबाबत अनेक वर्षे ग्रामपंचायतीने पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, जागेची स्थळपाहणी त्यांच्यासह संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी निधीही मंजूर केला आहे. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कोळकी ग्रामपंचायत गाळ्यामध्ये दोन-तीन पोलीस कर्मचारी ठेवून कामकाज सुरू केले; परंतु कालांतराने कर्मचारी वर्ग अपुरा असल्याचे कारण सांगत पुन्हा बंद केली.
-दत्तोपंत शिंदे, माजी सरपंच