पोलिस ठाण्यासमोरील कार्यालय फोडले
By Admin | Updated: October 24, 2016 00:34 IST2016-10-24T00:34:03+5:302016-10-24T00:34:03+5:30
चितळीनंतर आता लोणंद : ‘कुरिअर’मधील तिजोरीसह सात लाखांची रोकड लंपास

पोलिस ठाण्यासमोरील कार्यालय फोडले
कापडगाव : खटाव तालुक्यातील चितळी येथील जिल्हा बँकेतील दरोड्याची घटना ताजी असतानाच लोणंद पोलिस ठाण्यासमोरच असणाऱ्या कुरिअर कंपनीचे कार्यालय शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. गॅस कटरच्या साहाय्याने शटर तोडून आत प्रवेश करून सात लाख ११ हजार २६ रुपयांची रोकड असणारी तिजोरी घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
घटनास्थळ व लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोणंद येथे पोलिस ठाण्यासमोर फलटण रोडलगत ब्लू-डार्ट एक्स्प्रेस लिमिटेड या कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शटरचे सेंटर लॉक व साईडपट्ट्या गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. या ठिकाणी कंपनीची दोन दिवसांची रोख रक्कम असलेली व भिंतीला फिट केलेली तिजोरी चोरट्यांनी लंपास केली.
यामध्ये शुक्रवार, दि. २१ रोजीची १ लाख ६८ हजार ६८० रुपये, शनिवार, दि. २२ रोजीची ३ लाख २ हजार ३४८ रुपये व जेजुरी येथील कार्यालयातील दि. २१ व २२ रोजीचा २ लाख ३९ हजार ९८८ रुपयांचा भरणा असा ७ लाख ११ हजार २६ रुपये होते. बँकेला शनिवारी सुटी असल्याने दोन दिवसांची कॅश कंपनीमध्ये जमा होती. कंपनीचे कर्मचारी सचिन रणवरे हे रविवारी सकाळी कार्यालय उघडण्यासाठी आल्यावर त्यांना शटर व साईडपट्ट्या तोडल्याचे व शटर दीड फूट वर उचलल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती लोणंद पोलिसांना दिली.
सचिन रणवरे हे फलटण, जेजुरी व लोणंद येथे कुरिअरचा व्यवसाय करत असून, दोनच वर्षांपूर्वी त्यांनी लोणंद येथे ही शाखा सुरू केली होती. याची लोणंद पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक आर. एन. साळुंखे, हवालदार दत्तात्रय दिघे, अप्पा कोळवडकर तपास करत आहेत. (वार्ताहर)
शंभर फुटांवर घुटमळले श्वान...
श्वान पथकाला पाचारण केले असता श्वान फक्त शंभर फुटांवरच घुटमळले. त्यानंतर दुपारी तीन वाजता ठसेतज्ज्ञांना बोलविले; परंतु त्यांना कोणत्याही ठिकाणी ठसे जाणवले नाहीत. कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणा महिन्यापासून बंद असल्याने कोणताही सुगावा लागत नाही. दरम्यान, ‘एवढी रक्कम व वस्तू रात्री ठेवू नका,’ असे लोणंद पोलिसांनी महिन्यापूर्वीच बजावले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठी रक्कम चोरीला गेली.