पोलीस अधिकाºयावर ठाण्यातच हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:25 IST2017-08-11T23:25:17+5:302017-08-11T23:25:20+5:30

पोलीस अधिकाºयावर ठाण्यातच हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : वादावादी केल्यानंतर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, ता. फलटण) याने फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला चढविला. या मारहाणीमध्ये धस यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा एक दातही तुटला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुमार रणदिवे हा त्याच्या दोन मित्रांसमवेत महात्मा फुले मंडईमधील अमोल डोंबाळे यांच्या वडापाव गाड्यावर भजी आणि वडापाव खाण्यासाठी गेला होता. वडापाव व भजी खल्ल्यानंतर पैसे न देताच रणदिवे आणि त्याचे मित्र जाऊ लागले. यावेळी डोंबाळे यांनी त्यांना पैसे मागितले. त्यामुळे चिडून जाऊन रणदिवेने ‘पैसे काय मागतोस, तुझ्याजवळचे पैसे दे,’ असे म्हणत डोंबाळे यांच्या हातावर चाकूने वार केला. त्यानंतर रणदिवे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी कडईतील गरम तेल डोंबाळे यांच्यावर फेकले व गाडा उलटून निघून गेले.
या प्रकारानंतर डोंबाळे यांनी धावतच फलटण पोलिस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिस निरीक्षक धस यांनी रणदिवेला पकडून आणण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी काही तासांतच रणदिवेला पकडून पोलिस ठाण्यात आणले.
पोलिस निरीक्षक प्रकास धस यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले. यावेळी वडापाव चालक डोंबाळे तसेच दोन पोलिस कर्मचारी शेजारी उभे होते. वादावादीविषयी धस त्याच्याकडे चौकशी करत असतानाच रणदिवेने वडापाव चालक डोंबाळेकडे बघून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून गेला. पोलिस ठाण्यातच रणदिवेची दादागिरी सुरू असल्याचे पाहून धस यांनी त्याला फै लावर घेतले. त्याचवेळी रणदिवेने अचानक धस यांच्या तोंडावर हल्ला केला. यामध्ये धस यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली तर त्यांचा पुढील एक दात तुटला. धस यांना मारहाण केल्यानंतर रणदिवे तेथून पळून गेला. मात्र, पोलिसांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच त्याला पकडून अटक केली.
प्रकाश धस यांचा होता वाढदिवस
पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. मात्र, त्यांचे भाऊ व कºहाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास धस यांना अटक झाल्याने ते चिंतेत होते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारतानाही ते चिंताग्रस्त दिसत होते. अशा परिस्थितीत त्यांच्यावर पोलीस ठाण्यातच हल्ला झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.