सुनसान रस्त्यावर पोलिसांचा संयमाने लढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:40+5:302021-04-25T04:38:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाला गत दीड वर्षापासून जवळून अनुभवणारे पोलीस आजही तितक्याच संयमाने, धैर्याने सुनसान रस्त्यावर ड्युटी ...

सुनसान रस्त्यावर पोलिसांचा संयमाने लढा!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाला गत दीड वर्षापासून जवळून अनुभवणारे पोलीस आजही तितक्याच संयमाने, धैर्याने सुनसान रस्त्यावर ड्युटी बजावत आहेत. आपला एक एक सहकारी बाधित आढळून येत असतानाही पोलीस कर्मचार्यांचे मन विचलित झाले नाही. जनतेवर आलेले संकट रस्त्यावर उभे राहून छातीवर झेलत आहेत.
जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली ती पोलिसांनी. कोरोनाच्या रूपाने आलेले संकट निधड्या छातीवर पेलण्यासाठी पोलीस सज्ज झाले. जनता घरामध्ये सुरक्षित असताना पोलीस मात्र सुनसान रस्त्यावर ड्युटी बजावू लागले. लढाईत जसा एकेक मावळा धारातीर्थी पडत होता, तसे पोलीस दलातील कर्मचारीही कोरोनाच्या विषाणूमुळे धारातीर्थी पडत होते, तर अनेकजण कोरोनाबाधित आढळून येत होते. तरीसुद्धा पोलिसांनी आपले कर्तव्य अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले. रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर हेच पोलीस कर्मचारी गावोगावी जाऊन रुग्णाचे निकटवर्तीय शोधायचे. वेळ पडल्यास मोबाईल लोकेशनचा तांत्रिक वापर करून नागरिकांना सतर्क करायचे. एखाद्या आरोपीचा जसा शोध घेतला जातो, तसा कोरोनाबाधिताच्या निकटवर्तीयांचा शोध घेतला जात होता.
तर दुसरीकडे घरात बसून कंटाळलेली जनता अधूनमधून रस्त्यावर येऊ लागली. त्यामुळे पोलीस आणि जनतेचे वादही होऊ लागले. हे सारे प्रकार झेलूनही पोलिसांनी संयम ढळू दिला नाही. बारा तास ड्युटी करून पोलीस घरी जात होते. त्यावेळी घरात गेल्यानंतर कुटुंबाच्या काळजीने त्यांचे मन हेलावून जात होते. आता दुसऱ्या वर्षीही सलग हीच परिस्थिती पोलिसांवर ओढवली असली, तरी पोलिसांनी आणखीनच मन घट्ट केले. पहिल्या टप्प्यामध्ये पोलिसांनी लसीकरण केले. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या केवळ ३८ राहिली. गतवर्षीही कोरोनाबाधितांची संख्या पोलीस खात्यामध्ये तब्बल ३७८ होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांच्या पाठीशी अनुभव चांगला असल्यामुळे बाधितांची संख्या पोलिसांना कमी करता आली. मात्र, तरीसुद्धा पोलिसांसमोरील समस्या काही सुटल्या नाहीत. रोज सकाळी घराबाहेर पडल्यानंतर संध्याकाळी घरी येताना आपण कोरोना तर घरी घेऊन आलो नाही ना, याची धास्तीही सध्या पोलिसांना लागली आहे. अजूनही लोक रस्त्यावरून इकडे तिकडे भटकत आहेत. या लोकांना समजावता समजावता पोलिसांच्या नाकी नऊ येत आहे.
गतवर्षीचा लॉकडाऊन आणि यंदाचा लॉकडाऊन यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. गतवर्षी पोलिसांना जवळपास सहा ते सात महिने कोरोना हीच ड्युटी होती. परंतु, यंदा कोरोनाची ड्युटी तर आहेच, याशिवाय आता चोरी, मारामाऱ्या, घरफोडी, अपघात अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत. या गंभीर गुन्ह्यांचा तपासही पोलिसांना करावा लागतोय. या कोरोनाच्या महामारीमध्ये अशा प्रकारे पोलिसांना दुहेरी भूमिका बजावावी लागतेय. मात्र, तरीसुद्धा जनतेच्या सेवेचे व्रत अंगीकारलेल्या पोलिसांनी हार मानलेली नाही.
कोट :
सुरुवातीला जेव्हा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते, त्यावेळी आमच्या सर्व पोलिसांना थोडी धास्ती होती. मात्र नंतर आम्ही धाडसाने या संकटावर मात करण्याचा निर्णय घेतला. जनता सुरक्षित असेल तरच आम्ही सुरक्षित. त्यामुळे पहिल्यांदा जनतेला आम्ही प्राधान्य दिले. आजही आम्ही उन्हातान्हात रस्त्यावर ड्युटी बजावतोय. हे आमचं कर्तव्य असले तरी जनतेनेही आम्हाला साथ देऊन स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी हीच अपेक्षा आहे.
दीपक पोळ; पोलीस कर्मचारी, सातारा तालुका पोलीस ठाणे