पोलीस वसाहतीला पाटणमध्ये घरघर...
By Admin | Updated: August 6, 2015 20:43 IST2015-08-06T20:43:04+5:302015-08-06T20:43:04+5:30
डोक्यावर गळके छप्पर : निधी उपलब्ध असूनही दुर्लक्ष

पोलीस वसाहतीला पाटणमध्ये घरघर...
पाटण : तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य निभावणाऱ्या पोलीसदादाच्या निवाऱ्याचा प्रश्न अनेक वर्षे लोंबकळत पडला आहे. पाटण शहरातील जुनी ब्रिटिशकालीन पोलीस वसाहत मोडकळीस आलेली आहे. गळके कौलारू छप्पर डोक्यावर घेऊन आपली गुजराण करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाची मोठी वाताहत होत आहे. नवीन वसाहतीसाठी जागा आणि निधी उपलब्ध असूनदेखील वसाहतीच्या बांधकामचे घोडे कुठे अडलंय, हे कळून येत नाही. पाटण पोलीस ठाण्याअंतर्गत १०४ गावे येतात, त्यासाठी सुमारे ६० पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, या सर्वांना शासकीय पोलीस वसाहतीत निवासाची व्यवस्था केली गेलेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी स्वतंत्र भाड्याने खोली घेऊन राहतात. पाटणची ब्रिटिशकालीन पोलीस वसाहत अत्यंत जुनी असून, कौलारू आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीचे वासं मोडले असून, पावसाळ्यात कौलारू छप्परातून पाण्याची गळती होते. या वसाहतील पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. शौचालये, स्वच्छतागृहे नादुरुस्त व देखरेखीअभावी निरुपयोगी झालेली आहेत. विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनी पोलिसांच्या वसाहतीबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. मात्र, त्याची अमंलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
पोलीस कवायत मैदान बनले पडीक
पाटणला पोलिसांसाठी कवायत मैदान आहे. त्या शेजारीच पोलीस वसाहत आहे. नवीन पोलीस वसाहत बांधायची झाल्यास भरपूर जागा उपलब्ध आहे. मात्र, येथील कवायत मैदानाचा वापर होत नसल्यामुळे ते पडीक बनले आहे. पाटण पोलीस ठाण्यात येणारे पोलीस अधिकारी वसाहतीच्या समस्यांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा करत नसल्याचे जाणवते. बाहेरून तालुक्यात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची मोठी गैरसोय होत असते.