सावंतवाडीमध्ये पोलिसाचे घर फोडले
By Admin | Updated: December 26, 2014 00:12 IST2014-12-25T23:00:14+5:302014-12-26T00:12:21+5:30
आणखी दोन घरांत चोरी : अकरा हजार रोख लंपास

सावंतवाडीमध्ये पोलिसाचे घर फोडले
सावंतवाडी : कलमठ, कणकवली येथे मंगळवारी रात्री चार घरे फोडण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच सावंतवाडी
शहरात काल, बुधवारी रात्री तीन बंद घरे फोडण्यात आली. यात एक घर पोलीस कर्मचाऱ्याचे आहे. मात्र, या तिन्ही घरांतून मोठ्या वस्तू चोरीस गेल्याची कोणतीही माहिती पोलिसांना प्राप्त झाली नाही. यातील दोघांनी रात्री उशिरापर्यंत तक्रारच दिली नव्हती.
कणकवली येथील कलमठ येथे मंगळवारी चार घरे फोडून ४० हजारांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेला अवघे २४ तास उलटले नसताना तोच प्रकार सावंतवाडीत घडला आहे. मात्र, चोरट्यांनी सावंतवाडीत बंद घरांना निशाणा केला असून, यातील तिन्ही घरे बंद होती. यात ज्युस्तीननगर भागात असलेले राजेंद्र गजानन सावंत हे आपल्या जुन्या घरी लग्नानिमित्त गेले होते. दोन दिवस त्यांचे नवे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी काल रात्री या घरावर हातसफाई केली. घराची समोरच्या बाजूची कडी काढून घरातील ११ हजारांची रोख रक्कम लंपास केली. यावेळी चोरट्यांनी घरातील सर्व सामान विस्कटून टाकले होते. हा प्रकार आज, गुरुवारी राजेंद्र सावंत यांची पत्नी कामानिमित्त नव्या घरी आली तेव्हा लक्षात आला. त्यांनी याबाबतची घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली.
तर न्यु खासकिलवाडा भागात राहत असलेले पोलीस हवालदार दीपक दळवी हे काल घर बंद करून वडिलांच्या बाराव्यासाठी गावी गेले होते. त्यांच्या आजूबाजूचा परिसर लोकवस्तीचा आहे, असे असतानाही चोरट्यांनी घराच्या समोरच्या बाजूचे कुलूप काढून आतमध्ये प्रवेश केला व घरातील सामान विस्कटून टाकत पैसे तसेच अन्य सोन्याची वस्तू मिळते काय, याची पाहणी केली. मात्र, त्यांच्या हाताला कोणतीही
चीज वस्तू लागली नाही. या घटनेची माहिती दळवी यांना देण्यात आली असून, सायंकाळी उशिरापर्यंत ते सावंतवाडीत दाखल झाले नव्हते. दीपक दळवी सध्या सिंधुदुर्ग जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत.
सावंतवाडीतील ज्युस्तीननगरमध्ये राहणाऱ्या वैभव चव्हाण यांचे घर नव्याने बांधण्यात आले असून, ते घर गेले काही दिवस बंद होते. त्यांच्या घराचा उद्या, शुक्रवारी गृहप्रवेश होता. यासाठी गुरुवारी घरातील नातेवाईक घर उघडण्यासाठी सावंतवाडी येथे आले असता, त्यांना घराची कडी काढलेली दिसली. तसेच घरातील सामानही विस्कटून टाकण्यात आले आहे. याबाबतची माहिती वैभव चव्हाण यांनी उशिरा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. (प्रतिनिधी)
पुन्हा चोरट्यांची दहशत
गेले काही दिवस सावंतवाडीत चोरीचे सत्र थांबले होते. मात्र, पुन्हा एकदा हे सत्र सुरू झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी सांगितले की, गोव्याकडे मौजमजेसाठी जाणाऱ्या युवकांचे
काम असावे.
याबाबतचा तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.