तासगावात पोकलॅन पेटवला
By Admin | Updated: July 2, 2014 00:25 IST2014-07-02T00:20:07+5:302014-07-02T00:25:59+5:30
तिघांवर गुन्हा : कृष्णा नदीपात्रात वाळू उपशावरून वादातून घटना

तासगावात पोकलॅन पेटवला
सातारा : कृष्णा नदीपात्रात वाळू उपसा करणारे पोकलॅन सातारा तालुक्यातील तासगाव येथील गावकऱ्यांनी पेटवून दिले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संजय सावंत, संकेत घोरपडे, चंद्रकांत जाधव या तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. पोकलॅन मालक विक्रम घोरपडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान, या ठिकाणी सुरू असणारा उपसा अवैध असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असलेतरी तहसीलदारांनी मात्र रात्री उशिरा याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदविली नव्हती.
कृष्णा आणि वसना नदीचा संगम सातारा तालुक्यातील तासगाव येथे झाला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. मात्र, महसूल विभाग हा उपसा अवैध तर खनिकर्म विभाग उपसा वैध असल्याचे सांगत आहे.
दरम्यान, तक्रारदार विक्रम घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा पोकलॅन संजय सावंत, संकेत घोरपडे, चंद्रकांत जाधव या तिघांना भाड्याने दिला होता. त्याचे पैसे मागितले म्हणून संबंधितांनी पोकलॅन पेटवून दिला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णू पवार करत आहेत. (प्रतिनिधी)