‘तिच्या’ जन्माचा गायिला पोवाडा!

By Admin | Updated: November 15, 2015 23:43 IST2015-11-15T20:14:05+5:302015-11-15T23:43:24+5:30

राष्ट्रीय कला महोत्सव : ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश घेऊन साताऱ्याची टीम चालली दिल्लीला

Poetry of her 'Birthday!' | ‘तिच्या’ जन्माचा गायिला पोवाडा!

‘तिच्या’ जन्माचा गायिला पोवाडा!

सातारा : पोवाडा हा शब्दच मर्दुमकीने व्यापलेला आहे. पोवाड्यात स्त्रियांचा उल्लेख मोघम, गरजेपुरताच आढळतो. अशा वेळी स्त्रीजन्माची महती पोवाड्यात बांधण्याचा सातारकरांचा धाडसी निर्णय प्रचंड यशस्वी ठरला असून, ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’चा संदेश घेऊन सातारकर मुलं-मुली थेट दिल्लीला चालली आहेत.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय कला महोत्सवात सातारकरांनी अजिंक्यपद खेचून आणलंय. लोकनाट्य, लोकगीत आणि लोकनृत्य या तीनही प्रकारांत सातारची मुलं सरस ठरली आहेत. प्रथम जिल्हास्तर, नंतर विभागीय आणि आता राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून ही मुलं राष्ट्रीय महोत्सवासाठी दिल्ली वारीसाठी सज्ज झाली आहेत.
लोकगीत प्रकारात विद्यार्थी आणि शिक्षकांनी एक अफलातून प्रयोग केला आहे. जिल्हास्तरीय महोत्सवात साताऱ्याची लावणी ‘हिट’ ठरली होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही व्यक्तिगत भावनांपासून सुरू होऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत घेऊन जाणारी अद्वितीय लावणी संकल्प कांबळे या भवानी विद्यामंदिरातील विद्यार्थ्याने गायिली होती.
जिल्हास्तरीय महोत्सवानंतर संपूर्ण जिल्ह्यातील मुलांची वेचून निवड करून विभागीय स्पर्धेसाठी टीम बनवायची होती. लोकगीतासाठी ही जबाबदारी भवानी विद्यामंदिरातील शिक्षक बाळासाहेब चव्हाण आणि कुमठे (नागाचे) येथील कुंभेश्वर विद्यालयाचे शिक्षक, शाहीर भानुदास गायकवाड यांच्याकडे होती.
संघनिवड सुरू असतानाच राष्ट्रीय स्तरावरून विषय जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा विषय लोकसंगीतासाठी दिला. पश्चिम महाराष्ट्रातील संघांना लावणी, पोवाडा आणि सांप्रदायिक भजन यापैकी एका कलाप्रकारात या विषयाची बांधणी करायची होती. स्त्रीजन्माविषयी भाष्य करण्यासाठी अन्य दोन तुलनेनं सोपे पर्याय उपलब्ध असताना ‘पोवाडा’ प्रकाराची निवड केली ती भानुदास गायकवाड यांनी.
पोवाडा नेहमी मर्दांचाच का गायचा? स्त्रीजन्माची महती पोवाड्यात का येऊ नये? अशा विचारातून गायकवाड यांनी पोवाडा रचायला सुरुवात केली. इकडे बाळासाहेब चव्हाण यांनी निवड केलेल्या विद्यार्थ्यांकडून मेहनत घ्यायला सुरुवात केली. भवानी विद्यामंदिरातील ऋत्विक चोरगे, हृषीकेश देशमुख हे दोन गायक कलावंत आणि रोहित माने या हार्मोनियम वादकाची निवड झाली होती.
याखेरीज टीममध्ये नागेवाडीच्या लोकमंगल हायस्कूलमधील सत्यम सावंत, अपशिंगे (मिलिटरी) येथील छ. शिवाजी विद्यालयाचा दीपक सपकाळ, सातारच्या कन्या शाळेची श्रुतिका पुजारी, बिदालच्या नवमहाराष्ट्र हायस्कूलची साक्षी खरात आणि औंधच्या श्री श्री विद्यालयाची सोनाली काळेल यांचा समावेश आहे. ही मुलं-मुली दिल्ली दरबारातून यशस्वी होऊनच परततील, असा विश्वास शिक्षकांना आहे. (प्रतिनिधी)


असा हा पोवाडा
सादरकर्त्या टीमला केवळ सादरीकरण नव्हे, तर संबंधित कलाप्रकाराची माहिती सादर करणेही बंधनकारक असून, त्यातून कलेचा अभ्यास होणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या माहितीनुसार, ‘प्र’ आणि ‘वद’ या शब्दसमुच्चयातून ‘प्रवाद’, ‘पवाडा’ आणि पुढे ‘पोवाडा’ असे शब्द अपभ्रंशाने तयार झाले आहेत. ‘प्रवाद’चा अर्थ ‘सविस्तर वृत्तांत’ असा सांगितला जातो. प्राचीन मराठीत विस्तार, सामर्थ्य, पराक्रम, स्तुती असा अर्थ घेतला गेला. देवादिकांच्या गोष्टी सांगण्यासाठी प्रारंभी पोवाड्याचा वापर होत असे. नंतर राजाच्या पदरी असलेले भाट पोवाडा गात असत. नंतर पोवाडा गाणारे शाहीर तयार झाले, असे मानले जाते.


पोवाडाच का?
पोवाडा हा वीररसाची निर्मिती करणारा कलाप्रकार असला तरी जनजागृतीसाठी स्वातंत्र्यलढ्यापासून पोवाड्याचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गद्य आणि पद्याचा मेळ घालून मनोरंजनातून प्रभावी प्रबोधन पोवाड्यातून करता येते. पूर्वी शूरांचा पोवाडा शूरांच्या समोरच गायिला जात असे. परंतु सद्य:स्थितीत समाज जागा करण्यासाठी पोवाड्याचा प्रभावी उपयोग केला जातो. त्यामुळेच ‘बेटी बचाओ’सारख्या ज्वलंत विषयावर पोवाडा करण्याची संकल्पना पुढे आली.


गुणी गायक-वादकांची टीम
पोवाडा गाणारा मुख्य गायक संकल्प कांबळे पाचवीपासूनच बाळासाहेब चव्हाण यांच्याकडे संगीताचे धडे घेतो. रोहितसुद्धा त्यांच्याकडेच हार्मोनियम शिकतो. पोवाड्याचा सर्वांत महत्त्वाचा घटक असलेली ढोलकी मायणीच्या भारतमाता ज्युनियर कॉलेजचा राजेंद्र घोलप याच्या हातात आहे. मायणीहून सांगलीला जाऊन ढोलकी शिकलेल्या राजेंद्रचा तोडा वाजला की रसिकांचे पाय थिरकू लागतात, हा अनुभव जिल्हा आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेत सर्वांनाच आला आहे.

Web Title: Poetry of her 'Birthday!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.