गोकाक पाणीपुरवठा संस्थेत भूखंड घोटाळा
By Admin | Updated: March 10, 2016 23:47 IST2016-03-10T22:18:19+5:302016-03-10T23:47:50+5:30
पत्रकार परिषद: अशोकराव थोरात व सुधाकर शिंदेंचा आरोप; संस्था राजकीय अड्डा बनली

गोकाक पाणीपुरवठा संस्थेत भूखंड घोटाळा
मलकापूर : गोकाक पाणीपुरवठा संस्था ही राजकारणाचा अड्डा बनली आहे. असा आरोप करत ताळेबंदात तोटा दाखवून संस्थेच्या मालकीची जागा खासगी व्यावसायिकांना भाडेतत्वावर देणे हा बेकायदेशीर ठराव करण्यात आला आहे. संस्थेच्या जागेत होत असलेला पेट्रोलपंप नेमका कोणाच्या मालकीचा आहे. हे कागदोपत्री प्रोसिडिंगच्या ठरावात नाही. मात्र, पंपाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. ही संस्थेच्या सभासदांची दिशाभूल आहे. यावरून नऊ गुंठ्यातील पेट्रोल पंपाच्या जागेचा घोटाळा होत असल्याचा आरोप अशोकराव थोरात व सुधाकर शिंदे यांनी केला आहे.
मलकापूर येथील मळाई टॉवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सभासद अंकुश जगदाळे उपस्थित होते.
सुधाकर शिंदे म्हणाले, ‘गोकाक संस्थेच्या कामकाजाबाबतची व प्रोसिडिंगची नक्कल मागणीसाठी सहा महिने प्रयत्न केले. मात्र, माहिती देण्यास सचिवासह संचालक मंडळाने टाळाटाळ केली. शेवटी सहकारी उपनिबंधकांकडे दाद मागावी लागली. उपनिबंधकांंनी केलेल्या सूचनेनुसार संस्थेच्या सचिवांनी लेखी स्वरूपात माहिती दिली.
ताळेबंद, प्रोसिडिंग व पोटनियमांची नक्कल मागितली असता ताळेबंद व प्रोसिडिंग दिले. दिलेल्या प्रोसिडिंगमधील माहितीनुसार २०११ मध्ये केलेल्या ठरावावरून २०१५-१६ मध्ये जागा देण्याबाबत चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बांधकाम सुरू असलेल्या पेट्रोलपंपाबाबत कंपनीशी केलेला करार अथवा त्याची सत्यप्रत किंवा त्याबांधकामाचे नकाशे, परवाने अस्तित्वात नाहीत किंवा हा पेट्रोलपंप संस्थेच्या मालकीचा की, अन्य कोणा खासगी मालकीचा याबाबतही कोणतेही लेखी दाखले दिलेले नाहीत. यावरून संस्थेच्या नऊ गुंठे जागेचा नेमका एक घोटाळा होण्याची शक्यता आहे. तरी सभासदांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. हे बेकायदेशीर बांधकाम न थांबविल्यास वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागू,’ असा इशाराही यावेळी सुधाकर शिंदे यांनी दिला. (प्रतिनिधी)
गैरविधाने करून बोळवण
संस्थेच्या कामकाजाबाबत खुलासेवार लेखी माहिती मिळविण्यासाठी आम्ही आॅक्टोबर महिन्यापासून वेळोवेळी लेखी मागणी केली. परंतु संस्थेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. सहा महिन्यांपासून उडवाउडवीची उत्तरे देऊन सातत्याने आमची नुसती बोळवनच केली. शेवटी उपनिबंधक कार्यालयाकडे दाद मागावी लागली. हा सभासदांपासून वस्तूस्थिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अशोकराव थोरात यांनी केला.
‘संस्थेच्या ताळेबंदानुसार दाखविलेला तोटा २ लाख ७७ हजार ६० रुपये असून, प्रत्येक्ष फेब्रुवारी २०१६ च्या मेरीज पत्रकानुसार संस्था १० लाखाने तोट्यात असल्याचे दर्शवत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. संस्थेच्या हिताची नाही,’ असा आरोप सध्याच्या संचालक मंडळावर गोकाक पाणी पुरवठा संस्थेचे सदस्य अंकुश जगदाळे यांनी केला.
कोणत्याही सहकारी संस्थेचा कारभार हा नियमानुसार चालतो. त्यामुळे विरोधकांनी असे काही आरोप केले असतील तर ते तत्थहीन आहेत. त्यांचे आरोप पूर्णपणे समजून घेऊन योग्यवेळी त्यांना योग्य ते उत्तर देऊ.
- मनोहर शिंदे
संचालक, गोकाक पाणी पुरवठा संस्था, मलकापूर