मुसळधार पावसाने यवतेश्वर घाटाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST2021-07-25T04:32:12+5:302021-07-25T04:32:12+5:30

शहराच्या पश्चिमेकडील भागात अकस्मात दरडी कोसळणे व संरक्षक कठडा ढासळणे, रस्ता खचणे अशा घटना घाटात सतत घडत असून, कालच्या ...

Plight of Yavateshwar Ghat due to torrential rains | मुसळधार पावसाने यवतेश्वर घाटाची दुर्दशा

मुसळधार पावसाने यवतेश्वर घाटाची दुर्दशा

शहराच्या पश्चिमेकडील भागात अकस्मात दरडी कोसळणे व संरक्षक कठडा ढासळणे, रस्ता खचणे अशा घटना घाटात सतत घडत असून, कालच्या मुसळधार पावसाने तर घाटाची दयनीय अवस्था करून टाकली आहे. काल सायंकाळी व रात्री घाटात चार ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्त्यावर आल्या. धोकादायक वळणावर झाडे उन्मळून मोठे दगड, माती रस्त्यावर आल्याने काही ठिकाणी पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंती बुजल्याने पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यावरून वाहू लागला. बहुतांशी ठिकाणी खडी, माती, मुरूमाचे ढीगच्या ढीग रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने वाहतूक विस्कळीत होऊन वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काल सायंकाळी काही वाहनचालकांनी प्रत्यक्षदर्शी दरडी कोसळतानाचे चित्र पाहताच त्यांच्या काळजात धस्स होऊन पुढे जाण्याचे धाडस न करता त्यांनी आपला मोर्चा घराकडे वळवला. घाटाच्या वरील बाजूने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून तसेच धबधब्याचे पाणी जास्त असल्याने पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंती ओव्हरफ्लो होऊन पाणी, माती, मुरूम, खडी, दगड मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आले. दरम्यान, एक दुचाकी फसल्याचीदेखील घटना घडली. डोंगरावरून अकस्मात दरड कोसळण्याची तर पायाखाली रस्त्याला भेग पडण्याची तर बाजूला कठडे ढासळण्याची भीती निर्माण होत असल्याचे वाहनचालकांमधून सांगितले जात आहे.

घाटातील रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा लोंढा पाहता जणू काही ओढाच वाहत असल्याचे चित्र होते, असे वाहनचालकांनी सांगितले. याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंतींबरोबरच तेवढाच पाण्याचा प्रवाह रस्त्यावरून वाहतानाचे चित्र असल्याने बहुतांशी घाटात रस्त्याऐवजी केवळ माती, खडीचे ढीगच दिसत आहेत.

चौकट

शनिवार सकाळपासून बांधकाम विभागाकडून युद्धपातळीवर जेसीबीच्या साह्याने घाटातील रस्त्यावर आलेल्या दरडी हटविण्याचे व बुजलेल्या चरी मोकळ्या करण्याचे काम सुरू असून, आजच घाटातील सर्व अडथळे दूर करणार असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.

२४कास-रोड

मुसळधार पावसाने यवतेश्वर घाटाची दुर्दशा करून टाकली असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घाटातून प्रवास रामभरोसेच झाला आहे.

( छाया : सागर चव्हाण )

Web Title: Plight of Yavateshwar Ghat due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.