वडूजच्या खेळाडूंना बावीस वर्षांनंतरही क्रीडांगणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:11+5:302021-08-28T04:43:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : वडूज येथे १९९६ मध्ये राज्यातील पहिले क्रीडा संकुल म्हणून मान्यता मिळाली. तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा ...

The players of Vadodara are still waiting for the stadium after 22 years | वडूजच्या खेळाडूंना बावीस वर्षांनंतरही क्रीडांगणाची प्रतीक्षा

वडूजच्या खेळाडूंना बावीस वर्षांनंतरही क्रीडांगणाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : वडूज येथे १९९६ मध्ये राज्यातील पहिले क्रीडा संकुल म्हणून मान्यता मिळाली. तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल या धर्तीवर वडूज शहरात साडेदहा एकरात क्रीडा संकुल उभारले. धावपट्टी, बॅडमिंटन कोर्ट तयार केले. तालुक्यातील अनेक खेळाडूंना मैदानाअभावी कोणत्याही खेळाचा सराव करणे कठीण बनत आहे. मात्र, आजपर्यंत क्रीडा संकुल समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांनी नेहमीच पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

क्रीडा संकुलाच्या जागेत बावीस वर्षांपासून मैदानी खेळ कमी व अतिक्रमणे जादा झाली आहेत. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडील जागा १५ जानेवारी १९९० च्या अध्यादेशानुसार वडूज ग्रामपंचायतीकडे क्रीडांगणासाठी भाडेतत्त्वावर प्रदान केली. या ठिकाणी ६७ लाख रुपये खर्चून जिम्नॅस्टिक हाॅल व तालुका क्रीडा कार्यालय बांधले; परंतु त्या ठिकाणी वास्तव्य व देखरेख नसल्याने इमारतीचे नुकसान झाले आहे. खिडकीच्या काचा, बाथरूमची भांडी फुटली आहेत.

वडूजचा विस्तार पाहता खेळाची मैदाने अपुरी पडत आहेत. तालुकास्तरीय कोणत्याही प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा सुसज्ज जागेअभावी होत नाहीत. बॅडमिंटन कोर्ट इमारत तयार असली तरी हस्तांतरण रखडले आहे.

कार्याध्यक्ष तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच क्रीडा समितीची बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. बॅडमिंटन हाॅलमध्ये सिंथेटिक फ्लोअरिंग बसवण्याचे निश्चित केले. यासाठी अपेक्षित खर्चाला मंजुरीही देण्यात आली. दोन क्रीडा शिक्षक, एक लिपिक, दोन चौकीदार व एक सेवक, अशा कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठी मंजुरी दिली. अतिक्रमणाविषयीही ऊहापोह झाला. मात्र, तो विषय तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर टाकण्यात आला. विद्यमान आमदार मोहनराव कदम हे अध्यक्ष असून, ते बैठकीला अथवा क्रीडा संकुलाकडे फिरकले नाहीत. ठरावीक निमंत्रित सदस्यच हजर असतात. पूर्ण क्षमतेने समिती सदस्यांची हजेरी व धीरगंभीर चर्चा झाली, तर हे क्रीडा संकुल जिल्ह्याला आदर्श ठरू शकते.

प्रतिक्रिया

व्हीसीसी क्लब, वडूजच्या माध्यमातून ऐंशीच्या दशकापासून वडूजमध्ये जिल्हास्तरीय क्रिकेटचे सामने भरविले जात होते. त्याकाळी प्राप्त मैदानावर परिस्थितीनुसार सामने खेळविले जात होते. १९९६ पासून हे तालुकास्तरीय क्रीडांगण दुर्लक्षित असून, येथील नवोदित खेळाडूंवर अन्याय होत आहे.

-जालिंदर जाधव,

माजी खेळाडू

उर्वरित क्रीडा संकुलची प्रशासकीय बाबीवर लक्ष केंद्रित करून हे क्रीडा संकुल सर्वच खेळासाठी खेळाडूंना खुले केले जाईल. क्रीडा संकुल समितीच्या बैठकीमध्ये कर्मचारी नियुक्ती निर्णय घेण्यात आला आहे.

-अनिल सातव,

तालुका क्रीडा अधिकारी, वडूज

फोटो २७वडूज-क्रीडा

वडूज येथील याच साडेदहा एकरात तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.

Web Title: The players of Vadodara are still waiting for the stadium after 22 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.