किसन वीर कारखान्यात आता प्लास्टिकचे रस्ते

By admin | Published: November 29, 2015 11:16 PM2015-11-29T23:16:49+5:302015-11-30T01:19:01+5:30

टाकाऊ पासून टिकाऊ : प्रदूषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग

Plastic roads now in the Kisan Veer factory | किसन वीर कारखान्यात आता प्लास्टिकचे रस्ते

किसन वीर कारखान्यात आता प्लास्टिकचे रस्ते

Next

भुर्इंज : ‘प्लास्टिक कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील ग्रेट मिशन ग्रूप कन्सल्टंसी (जीएमजीसी) या ‘प्लास्टिक टार रोड’च्या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविलेल्या कंपनीच्या माध्यमातून कारखाना कायस्थळावर प्रायोगिक तत्त्वावर टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून रस्ते बनविण्यात येणार आहेत,’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, घनकचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या व प्लास्टिक रॅपर्सचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरण व स्वच्छतेला घातक ठरणाऱ्या या टाकावू प्लास्टिकपासून रस्ते बनविण्याचे पेटंट पुण्यातील गणेश हिंगमिरे यांच्या जीएमजीसी कंपनीला मिळालेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी या कंपनीने केंद्री्रय पर्यावरण मंत्रालयाकडून परवाना मिळविलेला असून, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘प्लास्टिक टार रोड’ ची शिफारस केलेली आहे.
पर्यावरण प्रदूषण व अस्वच्छतेला कारणीभूत ठरणारा प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न हा सर्वांसाठी डोकेदुखीचा व आरोग्याच्या दृष्टीने घातक असून, या प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मर्यादा आहेत. जीएमजीसीच्या तंत्रज्ञानातून प्लास्टिकपासून तयार होणारे रस्ते दीर्घायुषी असून, प्लास्टिकच्या एकदा केलेल्या रस्त्याला किमान पाच वर्षे दुरुस्ती करावी लागणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. या प्लास्टिक रस्त्यांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)


पुण्यानंतर जिल्हात प्रथमच उपक्रम
जीएमजीसी कंपनीकडून पुण्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रथमच किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर प्लास्टिकचा रस्ता होणार आहे. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्लास्टिक रस्ता वाई, पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांसह सातारा शहराला वरदान ठरणार असून, प्लास्टिक कचरा निर्मूलनाचा प्रश्नही या निमित्ताने निकालात निघेल, अशी आशा मदन भोसले यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Plastic roads now in the Kisan Veer factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.