जलवाहिनीतून निघाल्या प्लास्टिकच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:33 AM2021-01-15T04:33:22+5:302021-01-15T04:33:22+5:30

सातारा : रविवार पेठेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून चक्क पाणी व शाम्पूच्या बाटल्या काढण्यात आल्या. पाणीपुरवठा सभापती सीता हादगे व ...

Plastic bottles leaking from the waterway | जलवाहिनीतून निघाल्या प्लास्टिकच्या बाटल्या

जलवाहिनीतून निघाल्या प्लास्टिकच्या बाटल्या

Next

सातारा : रविवार पेठेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून चक्क पाणी व शाम्पूच्या बाटल्या काढण्यात आल्या. पाणीपुरवठा सभापती सीता हादगे व नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेने या पेठेचा पाणीपुरवठा तब्बल सहा दिवसांनंतर पूर्ववत झाला.

गेल्या काही दिवसांपासून रविवार पेठेचा पाणीपुरवठा पूर्णत: विस्कळीत झाला होता. नळाला पाणीच येत नसल्याची ओरड नागरिक सातत्याने करीत होते. याबाबत पालिकेकडे तक्रारी दाखल होताच पाणीपुरवठा सभापती सीता हादगे व नगरसेवक श्रीकांत आंबेकर यांनी गुरुवारी सकाळी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले.

पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी बगाडे हॉस्पिटल चौकातून पोवईनाक्याकडे गेलेल्या मुख्य जलवाहिनीचे खोदकाम करून तपासणी केली. जलवाहिनी कटरच्या साह्याने कापताच त्यामध्ये चक्क पाणी व शाम्पूच्या बाटल्या आढळून आल्या. दुरुस्तीनंतर जलवाहिनी पुन्हा बंदिस्त करण्यात आली. रविवार पेठेतील सर्वोदय कॉलनी, क्षीरसागर कॉलनी, कैकाडी वस्ती या भागाचा पाणीपुरवठा सहा दिवसांनंतर पूर्ववत झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, नागरिकांनी जलवितरण टाकी अथवा परिसरात कोणतीही वस्तू टाकू नये, असे करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिला आहे.

फोटो : १४ सातारा पाणीपुरवठा

साताऱ्यातील रविवार पेठेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गुरुवारी पाणी व शाम्पूच्या बाटल्या आढळून आल्या. या कामाची सीता हादगे व श्रीकांत आंबेकर यांनी पाहणी केली.

Web Title: Plastic bottles leaking from the waterway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.