पुतण्याच्या जन्मादिवशी झाडे लावून जीवनाचेही ‘सार्थक’
By Admin | Updated: May 10, 2017 22:44 IST2017-05-10T22:44:02+5:302017-05-10T22:44:02+5:30
अनोखा आनंदोत्सव : व्यापाऱ्याने हिकमतीने केले वृक्षांचे संवर्धन

पुतण्याच्या जन्मादिवशी झाडे लावून जीवनाचेही ‘सार्थक’
सचिन काकडे । -लोकमत न्यूज नेटवर्क --सातारा : घरात नवा ‘पाहुणा’ आल्यानंतर कोणाच्याही आनंदाला पारावर उरत नाही. मग ती मुलगी असो, की मुलगा. नव्या पाहुण्याचा जन्मोत्सव जो तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. साताऱ्यात राहणाऱ्या हरिनारायण धोंडिराम कासट यांनीही भावाला मुलगा झाल्यानंतर याचा आनंद आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पुतण्याच्या जन्मादिवशी त्यांनी आपल्या अंगणात बदामाची चार झाडे लावली आणि ती जगवलीही. आज या झाडांना एक तप पूर्ण झालं आहे.
वृक्षसंपदेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. मात्र, धावपळीच्या युगात आज कोणालाही या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र, सातारा येथील लोखंंडे कॉलनीत राहणारे हरिनारायण कासट याला अपवाद आहे. त्यांनी २४ वर्षांपूर्वी लावलेले नारळाचे झाड व १२ वर्षांपूर्वी लावलेली बदामाची झाडे आज डामडौलात उभी आहेत.
बारा वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला मुलगा झाला. घरातील सर्वांनाच याचा मोठा आनंद झाला. मात्र, आपण वेगळ्या पद्धतीने पुतण्याच्या जन्मोत्सव साजरा करायचा असा निर्धार हरिनारायण कासट यांनी केला. त्यानुसार त्यांनी बदामाची चार झाडे आपल्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत लावली आणि त्यांचे संवर्धनही केले. हरिनारायण कासट यांच्यासह त्यांच्या तिन्ही भावंडांनी, सुना व मुलांनी या झाडांना पाणी घालून त्यांना हिकमतीने जगविले. आज चारपैकी बदामाची तीन झाडे २० फुटाची झाली असून, या झाडांचे आणि कासट कुटुंबाचे आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
२४ वर्षांच्या नारळामुळे परस्परांतील स्नेह वृद्धींगत
हरिनारायण कासट यांना झाडे लावणे अन् त्यांचे संवर्धन करण्याची पूर्वीपासूनच आवड आहे. आपल्या घराशेजारी त्यांनी १९९४ मध्ये नारळाचे झाड लावले आणि त्याला वाढवलेलही. नारळाचे झाड आज २४ वर्षांचे झाले आहे. नारळ हे मानाचे फळ आहे. घरात कोणीही आले की त्यांचा पाहुणचार घरातील नारळाने केला जातो. त्यानिमित्ताने परस्परांमधील स्नेह वृध्दींगत होतो असे कासट परिवाराचे म्हणणे आहे.
आम्ही मुलगी अथवा मुलगा असा भेदभाव कधीच केला नाही आणि मानतही नाही. घरी दोन मुलींचा जन्म झाला आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा झाडे लावून त्यांचे संगोपन करणार आहे. पुतण्याच्या जन्मावेळी लावलेली झाडे आज मोठी झाली आहेत. झाडांचे आणि त्याचे वय एकच आहे. आम्ही त्याचे नाव ‘सार्थक’ ठेवले आहे. झाडे लावून ती जगविल्याने आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनाचे ‘सार्थक’ झाल्यासारखे वाटत आहे.
- हरिनारायण कासट