सामाजिक बांधिलकी : सार्वजनिक जागेत रोपांची लागवड
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : बचत गटाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार’वर मोहोर उमटवणाऱ्या खोडशी (ता. कऱ्हाड) येथील क्रांती सहाय्यता गटाने सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श अन्य बचत गटांसमोर मांडला आहे.
दशसुत्रीच्या माध्यमातून स्वत:ची उपजीविका बळकट करण्याबरोबरच सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकीचे व्रत जोपासणाऱ्या क्रांती स्वयंसहायता समूहाने राज्य शासनाचा राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन’ हा पुरस्कार पटकावला आहे. या समूहाने नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. कोरोना संकटाच्या काळात या समूहाने कापडी मास्कची निर्मिती करून गरजू लोकांना उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना संकटात लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरविण्याची जबाबदारीही क्रांती समूहाने यशस्वीपणे पार पाडली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समूहाच्यावतीने खोडशी येथील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संगीता साळुंखे, प्रभाग समन्वयक श्रीकांत कुंभारदरे, समूहाच्या सुनीता कोळेकर, राणी भोपते, सुशीला शिंदे, भारती लाड, लता सावंत, नीलम लोंढे, कविता पवार, पूनम पुजारी ग्रामपंचायत सदस्य अर्चना पाटील, सुरेश भोसले, आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी क्रांती समूहाला बाजीराव भोसले, हणमंत भोपते, अवधूत पाटील, प्रवीण पुजारी, यशवंत कोळेकर, मोहन पाटील, धनाजी सावंत, अनिकेत भोपते, धनाजी इंगवले, शंकर भोसले, अशोक पांढरपट्टे यांनी विशेष सहकार्य केले.
फोटो : १९ केआरडी ०२
कॅप्शन : खोडशी (ता. कऱ्हाड) येथे क्रांती सहाय्यता समूहाने सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले.