वडिलांच्या रक्षाविसर्जनाऐवजी वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2015 01:05 IST2015-10-07T21:38:01+5:302015-10-08T01:05:53+5:30
स्मृती राहणार चिरंतन : बेलवडे बुद्रुकच्या मोहिते कुटुंबीयांनी पाडला नवा पायंडा -गूड न्यूज

वडिलांच्या रक्षाविसर्जनाऐवजी वृक्षारोपण
कऱ्हाड : वडिलांच्या स्मृती कायम जपण्यासाठी बेलवडे बुद्रुक, ता. कऱ्हाड येथील मोहिते कुटुंबीयांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर रक्षा व अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता स्मशानभूमीतील परिसरातच खड्डा खणून वृक्षारोपण केले. या झाडाला रक्षा व अस्थी घालून वृक्षारोपण केले. आणि आपल्या वडिलांच्या स्मृती कायम राखण्याचा नवा उपक्रम राबवून प्रत्येकाने रक्षा विसर्जन पाण्यात करून प्रदूषण करण्यापेक्षा वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृती वृक्षारोपनातून जागवण्याचा संदेश दिलाआहे.सर्वसामान्य कुटुंबातील कृष्णा मोहिते यांचे सहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. दरम्यान, त्यांचे दोन मुले आत्माराम मोहिते व सतीश मोहिते यांनी इस्लामपूर येथील सर्जेराव यादव प्रतिष्ठानच्या आवाहनाचा विचार करून आपल्या वडिलांची रक्षा विसर्जित न करता वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला.बेलवडे येथील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि मोहिते कुटुंबीयांनी हा आदर्शवत उपक्रम राबविला. देशात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश घरोघरी पोहोचवला जातो; पण त्यास प्रतिसाद कमी मिळत आहे. अनेक अडचणीही येत आहेत. पण स्मशानभूमीमध्ये रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम घेतल्यानंतर त्या रक्षाचे पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषण वाढेल; पण वृक्षारोपण केल्यास आपल्या माणसांच्या स्मृती जोपर्यंत ते झाड आहे, तोपर्यंत राहतील, असा या उपक्रमाचा हेतू आहे.
हा उपक्रम राज्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी राबविला तर आपल्या माणसांच्या स्मृती जागविता येतीलच शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)