नियोजन आराखडा नामंजुरीची नामुष्की !

By Admin | Updated: November 22, 2015 00:03 IST2015-11-21T23:38:36+5:302015-11-22T00:03:05+5:30

अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश : कामांच्या याद्या नसल्याने आमदारांचा विरोध; ४ डिसेंबरला फेरबैठक

Planning for the nomination of disappointment! | नियोजन आराखडा नामंजुरीची नामुष्की !

नियोजन आराखडा नामंजुरीची नामुष्की !

सातारा : जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत कामांच्या याद्या देण्यात प्रशासनाने कसूर केल्याने हा आराखडा नामंजूर करण्याची नामुष्कीच ओढवली. आमदार जयकुमार गोरे यांनी हा मुद्दा उपस्थित करून ‘बेकायदा ठराव करणार काय?’, असा संतप्त सवाल पालकमंत्री विजय शिवतारे यांना विचारला. दरम्यान, कामांच्या याद्या देण्यात कसूर करणाऱ्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना चौकशीनंतर बडतर्फ करण्याचे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.
जिल्ह्याचा २०१६-१७ सालाचा २१८ कोटींचा नियोजन आराखडा मंजूर करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेण्यात आली. पालकमंत्री विजय शिवतारे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना आमदार जयकुमार गोरे यांनी नियोजन आराखड्यासोबत कामांच्या याद्या जोडल्या नसल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आराखडा अपूर्ण असून, तो बेकायदेशीर ठरला आहे. त्यामुळे कायद्याने नियोजन आराखड्याला मंजुरी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही गोरेंचा हा मुद्दा उचलून धरून नवीन बैठक लावण्याची सूचना मांडली.
यावर पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी यांना धारेवर धरले. ‘कामांच्या पूर्ण याद्या आल्या नसल्याने त्या आराखड्यासोबत जोडल्या नसल्याचे माळी यांनी केलेले स्पष्टीकरण सदस्यांना दिशाभूल करणारे आहे,’ असा आरोप आमदार गोरे यांनी केला. आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शंभूराज देसाई यांच्यासह सर्वच सदस्यांनी गोरेंच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘त्यातूनही वेळ घालवायला नको,’ असे म्हणत पालकमंत्र्यांनी आराखड्याला मंजुरी देण्याची विनंती केली. पण आमदारांसह इतर सदस्यांचा विरोध कायम राहिला.
जवळपास एक तास यावर खल सुरू होता. पालकमंत्र्यांनी याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांना जवळ बोलावून त्यांच्या कानात काही चर्चा केली. खासदार उदयनराजेंनी सर्व सदस्यांच्या वतीने याबाबत आपले मत व्यक्त करताना आराखडा नामंजूर करताना कोणी राजकारण आणत नाही. पालकमंत्र्यांचा अवमान करण्याचाही त्यात हेतू नाही; पण आराखड्याला मंजुरी दिली गेल्यास ते बेकायदा ठरेल, त्यामुळे ज्या यंत्रणेने याद्या दिल्या नाहीत, त्यांच्याकडून बैठकीचा खर्च वसूल करण्याची मागणी केली. यानंतर पालकमंत्र्यांनी आराखडा मंजुरीसाठी दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बैठक घेण्याचा निर्णय जाहीर केला.

Web Title: Planning for the nomination of disappointment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.