येरळा नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST2021-09-23T04:45:20+5:302021-09-23T04:45:20+5:30

पुसेगाव : खटाव तालुक्यातील काटकरवाडी हद्दीत येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या ७० लाखंडी फळ्या चोरीला गेल्या आहेत. यामुळे पुसेगाव-काटकरवाडी ...

The planks of the embankment on the Yerla river were stolen! | येरळा नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला!

येरळा नदीवरील बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला!

पुसेगाव : खटाव तालुक्यातील काटकरवाडी हद्दीत येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या ७० लाखंडी फळ्या चोरीला गेल्या आहेत. यामुळे पुसेगाव-काटकरवाडी परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने, लाभक्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, काटकरवाडी हद्दीतील बंधाऱ्याला लोखंडी फळ्या टाकून दरवाजे बंद करावे लागतात. मात्र, बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला गेल्याने नदीपात्रातील पाणी न अडता वाहून जात आहे. परिणामी, परिसरात मोठा बंधारा असूनही पाणी साठणार नसल्याने, पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे.

या बंधाऱ्याला फळ्या टाकल्यानंतर जवळपास एक किलोमीटरच्या नदीपात्रात पाण्याचा साठा होतो. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय होते, तसेच पाणीसाठ्यामुळे वाळू तस्करीवर अंकुश येतो. यामुळे या फळ्यांच्या चोरीशी परिसरातील वाळू तस्करांचा संबंध असल्याचे काटकरवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला गेल्याने परिसरातील शेतीसोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचेही नुकसान होत आहे. तरीही संबंधित विभाग या बाबींकडे कानाडोळा करत असल्याचे लाभधारक सांगत आहेत. त्यामुळे बंधारा वाहून गेल्यावरच देखभाल, दुरुस्ती होणार का, असा प्रश्न येथील ग्रामस्थ करत आहेत.

कोट :

दहा वर्षांपूर्वी काटकरवाडी हद्दीत येरळा नदीवर बंधारा झाला. हा बंधारा निरुपयोगी झाला असून, त्याची वेळेवर देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे, तरच त्याचा उपयोग होईल. नाहीतर बंधारा फक्त नावापुरता उरेल.

- ज्ञानेश्वर काटकर, ग्रामस्थ कटकरवाडी.

चौकट :

...तरच शेतकऱ्यांना फायदा

पुसेगावपासून वाकेश्वरपर्यंतच्या बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असतात. काही दिवसांत जिहे-कठापूर योजनेचे पाणी नेर तलावात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांची देखभाल, दुरुस्ती झाली, तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

फोटो ओळ : काटकरवाडी, ता.खटाव येथे बंधाऱ्याच्या फळ्या चोरीला गेल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\\

Web Title: The planks of the embankment on the Yerla river were stolen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.