उरमोडीच्या पातळीवर ठरतेय स्मशानभूमीची जागा
By Admin | Updated: August 8, 2014 00:41 IST2014-08-07T21:49:21+5:302014-08-08T00:41:01+5:30
बनघर : आतापर्यंत आठवेळा उचलबांगडी; पावसाळ्यात शोधावी लागते जागा

उरमोडीच्या पातळीवर ठरतेय स्मशानभूमीची जागा
विशाल गुजर - परळी ,, परळी खोऱ्यातील जवळपास नव्वद टक्के गावांत स्मशानभूमी आहे. मात्र, बनघर गाव याबाबतीत अधांतरीच आहे. उरमोडी धरणाच्या बाजूला हे गाव वसलेलं असल्यामुळे धरणातील पाणीच ठरवते गावच्या स्मशानभूमीची जागा. धरणातील पाणी जसे कमी होत जाईल तशी स्मशानभूमी सरकते. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते.
बनघर हे गाव उरमोडी धरणात विस्थापित झाले आहे. २००० मध्ये त्याचे पुनर्वसन खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे झाले आहे. काही जणांना जमिनी मिळाल्या, काहींना मिळालीच नाही. तेथे पाण्याची गैरसोय, मुरमाड जमीन, मग खायचे काय, या विवंचनेमुळे या गावाने आपली मूळ जमीन सोडली नाही. या गावात १९५ कुटुंबे आहेत. ही कुटुंबे सहा ठिकाणी वसलेली आहेत. डोंगराच्या पायथ्याला गाव वसल्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी झाली आहे. धरणाची पाणीपातळी वाढली की अंत्यसंस्काराची जागा बदलावी लागते. उघड्यावर धरणाच्या काठी अंत्यसंस्कार केले जातात. पावसाळ्यात झाडाझुडपातून, काट्या-कुट्यातून, खाचखळग्यांतून वाट काढत स्मशानभूमीकडे जावे लागते. दीड-दोन किलोमीटरचा हा रस्ता तुडविणे म्हणजे जुलूम झाला आहे, अशा भावना व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींनी गावासाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
गाव उरमोडी धरणात गेले आणि सर्वजण वेगवेगळ्या पाच ठिकाणी राहिले. त्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी बदलली आहे. पावसाळ्यात जागा शोधून अंत्यविधी करावा लागतो.
- रमेश गुजर,
ग्रामस्थ, बनघर