कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:36+5:302021-04-05T04:35:36+5:30
रामापूर : कऱ्हाड-चिपळूण या राष्ट्रीय मार्गावर पाटण शहरापासून जवळ असणाऱ्या रामनगर येथे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हे अपघाताचे ठिकाण ...

कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर खड्डे
रामापूर : कऱ्हाड-चिपळूण या राष्ट्रीय मार्गावर पाटण शहरापासून जवळ असणाऱ्या रामनगर येथे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हे अपघाताचे ठिकाण होत आहे. या खड्ड्यांकडे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता याकडे लक्ष देत नाहीत. आता, या खड्ड्यांकडे किमान लोकप्रतिनिधींनी तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, पर्यटक, नागरिक करीत आहेत.
कऱ्हाड-चिपळूण हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर सतत लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठीचा हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या महामार्गाचे काम खूपच संथ गतीने चालू आहे. काम काही ठिकाणी अपूर्ण राहिले आहे. त्याकडे तालुक्यातील कोणाचे लक्ष नाही. या संथ गतीने चाललेल्या कामाचा त्रास सर्वसामान्य नागरिक, महामार्गालगत असणारे शेतकरी, प्रवासी यांना होतो आहे.
पाटण शहराचा भाग असणारे रामनगर येथे मार्गावर मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांत साचलेले पाणीही प्रवाशांच्या अंगावर उडून त्यांचे कपडेदेखील खराब झाले आहेत. तसेच, या साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून लहान अपघातदेखील झाले असून, या मार्गावर मोठा अपघात झाल्यानंतर हे खड्डे बुजविण्यात येणार आहेत का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कधी नवीन रस्त्या तयार होईल तेव्हा होऊ दे; पण किमान खड्डे तरी भरा, असे आवाहन प्रवासी, नागरिक आणि वाहनचालक करत आहेत.
चौकट
कऱ्हाड-चिपळूण महामार्गाचे कोट्यवधीचे काम घेणारी कंपनी चार खड्डे का बुजवीत नाही? एखाद्याचा जीव गेल्यानंतर खड्डे बुजविणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
फोटो -
कऱ्हाड-चिपळूण या मार्गावर पाटण शहराच्या हद्दीतील रामनगर येथे रस्त्यावर पडलेले खड्डे.