रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST2021-02-06T05:13:52+5:302021-02-06T05:13:52+5:30
कुकुडवाड : कुकुडवाड ते मायणी या रस्त्यावर असलेल्या कुकुडवाड ते नंदीनगर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा ...

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता!
कुकुडवाड : कुकुडवाड ते मायणी या रस्त्यावर असलेल्या कुकुडवाड ते नंदीनगर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या यावर्षीच्या पावसाने खचल्या आहेत. तसेच रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. कुकुडवाड ते नंदीनगर पाच किलोमीटर रस्त्यावरून जाताना व वाहनचालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
माण तालुक्याच्या दक्षिणेला असणाऱ्या कुकुडवाड हद्दीतील नंदीनगर येथील मानेवाडीनजीक व कुकुडवाड गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर नंदीनगर येथील खिंड म्हणजेच एक ते दीड किलोमीटरचा वळणाचा घाट आहे. या घाटात (खिंडीत) वेडीवाकडी वळणं आहेत. ही खिंड माण व खटाव या दोन तालुक्यांच्या सीमेवर असून, या रस्त्यावरून वाहनांची गर्दी असते. या खिंडीतून विटा, तासगाव, सांगली, कोल्हापूर या भागाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. तसेच कुकुडवाड ते नंदीनगर खिंड या पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच साइडपट्ट्या खचल्या आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून व खिंडीतून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या वर्षीच्या तुफानी पावसाने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. कुकुडवाड ते नंदीनगर रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मोठे अपघात झाले असून, जीवितहानी झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला कुकुडवाड ते नंदीनगर (खिंड) या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कल्पना व पाठपुरावा करूनही बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल केल्याचे दिसून येत नाही. या खिंडीत अपघात झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे.
(कोट)
कुकुडवाड गावापासून ते नंदीनगर खिंड या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी.
-शरद काटकर, कुकुडवाड
०४कुकुडवाड
कुकुडवाड ते नंदीनगर पाच किलोमीटर रस्त्यावरून जाताना व वाहनचालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.