जप्त पिस्तुलातूनच झाडल्या गोळ्या
By Admin | Updated: August 5, 2014 23:25 IST2014-08-05T22:48:57+5:302014-08-05T23:25:16+5:30
संजय पाटील खून खटला : न्यायवैद्यक अधिकाऱ्याची साक्ष

जप्त पिस्तुलातूनच झाडल्या गोळ्या
सातारा : आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच गोळ्या झाडण्यात आल्या असून, न्यायवैद्यक चाचणीमध्ये तसे स्पष्ट झाले आहे, अशी साक्ष न्यायवैद्यक अधिकारी राजेंद्र मावळे (रा.पुणे) यांनी दिली.
महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याची सुनावणी आज, मंगळवारी जिल्हा न्यायालयात झाली. न्यायवैद्यक अधिकारी मावळे म्हणाले, ‘मृताचे रक्त, रक्त पडलेली माती, अंगावरील शर्ट, घटनास्थळी सापडलेल्या ११ पुंगळ्या, एक जिवंत काडतूस, मृताच्या शरीरातून काढलेल्या तीन पुंगळ्या याची न्यायवैद्यक चाचणी घेण्यात आली. या सर्व वस्तू एकमेकांशी जुळून आल्या. नऊ एमएमटू पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या की नाही, हे तपासले असता त्यातून फायर झालेले होते, असे निष्पन्न झाले. पिस्तूल लपविलेल्या ठिकाणाची माती, पिस्तुलावर असणारी माती त्याच ठिकाणची आहे, असे तपासणीत निष्पन्न झाले.’यावेळी न्यायवैद्यक अधिकारी अमोल पवार, एन. एस. येवले, ए. एस. बडदे यांचीही साक्ष झाली. दरम्यान, तत्कालीन पोलीस निरीक्षक व या खटल्यातील आरोपी आणि तपासी अधिकारी संभाजी पाटील यांची आज साक्ष होणार होती. मात्र, मुदत मिळावी, असा अर्ज त्यांच्यावतीने न्यायालयात दाखल करण्यात आला. मागच्या सुनावणीवेळी फितुर घोषित केल्यामुळे संभाजी पाटील यांनी उच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्या अर्जावर दि. १३ ला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजचे खटल्याचे कामकाज तहकूब करून पुढील सुनावणी दि. २१ ला होणार असल्याचे न्यायाधीशांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)