तक्रार होताच नळकनेक्शन गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:49+5:302021-04-06T04:38:49+5:30
सातारा : सातारा शहरातील एका बोगस नळकनेक्शनचा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी पर्दाफाश केला. याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होताच संबंधितांकडून ...

तक्रार होताच नळकनेक्शन गायब !
सातारा : सातारा शहरातील एका बोगस नळकनेक्शनचा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी पर्दाफाश केला. याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होताच संबंधितांकडून तातडीने नळकनेक्शन काढून टाकण्यात आले. या बोगस नळकनेक्शनमागे नक्की काय गौडबंगाल आहे, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सातारा शहरात ३६ हजार मिळकती असून, अधिकृत नळ धारकांची संख्या १६ हजारांच्या घरात आहे. असे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात बोगस नळकनेक्शनच्या संख्येतही वाढ झाली आहे. पालिका प्रशासनाकडून आतापर्यंत अशा अनेक बोगस नळधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर काही कनेक्शन दंड भरून अधिकृत करण्यात आले आहेत. दरम्यान, यादोगोपाळ पेठेतील एका अपार्टमेंटमध्ये दोन बोगस नळकनेक्शन जोडण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अमित शिंदे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली होती. पालिकेची कोणतीही परवानगी न घेता संबंधितांनी नळजोडणी केली असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. नळकनेक्शनचा करार प्रशासनाकडे असेल तर तो दाखवावा. ज्यांनी नळकनेक्शन जोडले, त्या ठेकेदाराचे नाव स्पष्ट करावे. या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली होती. या तक्रारीची भनक लागताच संबंधित मिळकतधारकांकडून तातडीने आपले नळकनेक्शन काढून टाकण्यात आले. त्यामुळे या प्रकारामागे नक्की काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बोगस नळकनेक्शनमुळे पालिकेच्या महसुलाला कात्री लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील सर्व नळकनेक्शनचा तातडीने सर्व्हे करावा. बोगस कनेक्शन बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
दोन फोटो
यादोगोपाळ पेठेत एका अपार्टमेंटमध्ये जोडण्यात आलेले नळकनेक्शन पुन्हा काढून टाकण्यात आले.