पिंपळबन वृक्षसंवर्धन उपक्रम राज्यात आदर्श ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:23+5:302021-02-05T09:17:23+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ या ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्रितपणे सुरू केलेला पिंपळबन वृक्षसंवर्धन उपक्रम हा राज्यात आदर्श ठरेल, ...

पिंपळबन वृक्षसंवर्धन उपक्रम राज्यात आदर्श ठरेल
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ या ठिकाणी ग्रामस्थांनी एकत्रितपणे सुरू केलेला पिंपळबन वृक्षसंवर्धन उपक्रम हा राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास पिंपळबन समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला. कुडाळ याठिकाणी पिंपळबनाच्या संवर्धनासाठी दर मंगळवार आणि रविवार या दिवशी श्रमदान आयोजित केले जाते. याप्रसंगी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, डॉ. स्वामिनी चव्हाण, श्रीधर कांबळे, इम्तियाज मुजावर, महेश पवार, मनोज वंजारी, दत्तात्रय शिंदे, सचिन मदने, चेतन दळवी आदी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झाडांना आळी करून संरक्षण कुंपणाची स्वच्छता करण्यात आली .तसेच झाडांना पाणी घालण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील हा एक आगळा-वेगळा उपक्रम असून, ग्रामस्थ आणि पिंपळ समिती यांच्यामार्फत वृक्ष संवर्धनासाठी ही अनोखी चळवळ उभारली आहे. या उपक्रमांतर्गत गावाच्या चौफेर पिंपळ आणि वडाची झाडे लावलेली आहेत. दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे आता पाच ते सहा फुटांपर्यंत वाढली असून जोर धरू लागली आहेत. वृक्षसंवर्धनासाठी पिंपळबन समितीसह ग्रामस्थ यासाठी प्रयत्न करीत आहेत. कुडाळवासीयांच्या या उपक्रमाला हातभार मिळत आहे. आपण सर्वांनी याकरिता योगदान द्यावे, असे आवाहन पिंपळबन समितीचे सदस्य महेश पवार, मनोज वंजारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.
०३कुडाळ
फोटो: कुडाळ गावच्या चौफेर लावलेल्या पिंपळ व वडाच्या झाडांना पिंपळबन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणी घातले.