डेपोतील कचऱ्याचे चक्क रस्त्यावरच ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST2021-03-15T04:35:32+5:302021-03-15T04:35:32+5:30

सातारा : सातारा नगरपालिकेचा सोनगाव येथील कचरा डेपो सध्या ओव्हरफ्लो झाला आहे. डेपोतील कचऱ्याचे ढीग संरक्षक भिंतीच्या बाहेर रस्त्यावर ...

The pile of rubbish from the depot is on the road | डेपोतील कचऱ्याचे चक्क रस्त्यावरच ढीग

डेपोतील कचऱ्याचे चक्क रस्त्यावरच ढीग

सातारा : सातारा नगरपालिकेचा सोनगाव येथील कचरा डेपो सध्या ओव्हरफ्लो झाला आहे. डेपोतील कचऱ्याचे ढीग संरक्षक भिंतीच्या बाहेर रस्त्यावर साचू लागल्याने याचा वाहनधारक व स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सोनगावसह परिसरातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून कचरा डेपोमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या डेपोतून निघणारा धूर व समस्यांमुळे सोनगाव व जकातवाडी ग्रामस्थांनी आजवर अनेक आंदोलने केली. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने डेपोत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी केली. मात्र, तरीही ग्रामस्थांच्या समस्या मात्र आजही कायम आहेत.

सातारा शहरासह हद्दवाढीतील कचरा पालिकेकडून संकलित केला जातो. हा कचरा सोनगाव डपोत टाकला जातो. गेल्या काही दिवसांपासून डेपोत कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात ढीग साचू लागले असून, हा कचरा आता संरक्षक भिंत ओलांडून रस्त्यावर येऊ लागला आहे. या कचऱ्यातील प्लास्टिक व इतर वस्तू रस्त्यावर इतरत्र पसरत असून, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. सातारा पालिकेने तातडीने या परिसराची स्वच्छता करावी, अन्यथा सोनगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन उभारतील, असा इशारा सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

(कोट)

कचरा डेपोचा स्थानिक नागरिकांना नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे. कचरा डेपोत घनकचरा निर्मूलनाचा मोठा प्रकल्प उभारूनसुद्धा समस्या सुटलेल्या नाहीत. आता तर कचरा डेपोच्या बाहेर रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेने स्वच्छता न केल्यास सोनगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन उभारतील व होणाऱ्या परिणामांना पालिकाच जबाबदार असेल.

- महेश बाबर, सोनगाव ग्रामस्थ

फोटो : १५ सोनगाव कचरा डेपो

सातारा नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोच्या बाहेर अशा प्रकारेच कचऱ्याचे ढीग साचत आहेत. (छाया : सागर नावडकर)

Web Title: The pile of rubbish from the depot is on the road