कऱ्हाड : वीज कंपनीच्या कारभारामुळे अनेकवेळा दुर्घटना घडतात. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांना जाग येत नाही. सध्या शहरातील खांबांना वेलींचा विळखा पडला आहे. मात्र, तरीही कर्मचारी या वेली काढत नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीज कंपनीचा कारभार या-ना-त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. ग्राहकांच्या टीकेचे लक्ष सातत्याने वीज कंपनी असते. ठेकेदारांवर प्रशासनाचे नियंत्रण आहे का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला असून ठिकठिकाणी वाकलेले खांब, तुटलेल्या तारा आणि वेलींच्या विळख्यात अडकलेले खांब असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील जुना कोयना पूूल ते वारुंजी फाटा यादरम्यान वीज खांबांवर वेलींचा विळखा पडला आहे. हा रहदारीचा रस्ता आहे. वेली एवढ्या वाढल्या आहेत की वीजखांब यातून दिसेनासे झाले आहेत. त्यामधून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय तारांना वेलींचा विळखा पडल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. फ्यूज बॉक्स, तारांनाही वेलींनी वेढा दिला आहे. मात्र, वीज कंपनीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी वाकलेले खांब आणि तुटलेल्या तारा दुर्घटनेला निमंत्रण देत आहेत. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. वीज कंपनीकडून तुटलेल्या तारा जोडण्यास विलंब झाल्याने या तारेला स्पर्श होऊन शेतकरी व जनावरेही दगावली आहेत. कऱ्हाड शहरात गर्दीच्या ठिकाणी सध्या ही परिस्थिती असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने या वेली काढाव्यात तसेच फ्यूज बॉक्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.