फलटण : फलटणमधील एका शेतकऱ्याने फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने दिले जातील, अशी जाहिरात दिली. हे पाहून कर्नाटकातून दोघे आले. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन घेऊन गेले. मात्र, परस्पर विकून पसार झाले होते.फलटण पोलिसांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. कर्नाटकातूनपोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ६५ लाखांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन (वय ३८, रा. वासावी स्कूलच्या मागे, चित्रदुर्ग, कर्नाटक), इदमा हबीब रेहमान कुंजी बियारी (वय ६४, रा. दक्षिण कन्नाडा, कर्नाटक) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फलटण शहरातील शेतकरी विजय संपत माने यांनी फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने दिले जातील, अशी जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून मुस्ताक हुसेन याने माने यांच्याशी संपर्क साधला. फलटण येथे येऊन त्याने आमच्याकडे राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे सांगितले.माने यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन भाड्याने करार करून कर्नाटक येथे घेऊन गेला. त्यानंतर माने यांनी ठरल्याप्रमाणे भाडे घेण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला असता आरोपीने मोबाइल बंद केला व त्याने दिलेला पत्ता व सरकारी कामाची वर्क ऑर्डर खोटी असल्याचे लक्षात आले. या प्रकारानंतर माने यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपीचा कर्नाटकासह मुंबई या ठिकाणी शोध घेतला. त्यावेळी आरोपी मुस्ताक हुसेन हा नायगाव, मुंबई येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली.त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर त्याने त्याचा साथीदार इदमा बिहारी याने खोटी कागदपत्रे तयार करून वाहने तामिळनाडू येथे विकल्याचे सांगितले. पोलिसांनी बिहारी यालाही अटक केल्यानंतर पोलिसांचे पथक तामिळनाडू येथे पोहोचले. तेथून दोन ट्रॅक्टर व पोकलेन हस्तगत केले. शेतकऱ्यांना फसविणारी ही टोळी असून, यात आणखी काहींचा सहभाग आहे. ही टोळी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर, पोकलेन अशी वाहने घेऊन दुसऱ्या राज्यात विकत होती.दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मंचर येथून चोरलेला आणखी एक ट्रॅक्टर दलालामार्फत कर्नाटकात विकल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष कदम, हवालदार पुनम बोबडे, काकासो कर्णे, अतुल बडे, जितेंद्र टिके यांनी केली.
Satara: ट्रॅक्टर भाड्याने नेले, परस्पर विकून पसार झाले; पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश, कर्नाटकातून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:27 IST