फड जळत राहिला आणि ते बघत राहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:08+5:302021-02-06T05:14:08+5:30

मलटण : उद्या किंवा परवा ऊस तोडला जाणार होता. वर्षभर अतिशय मेहनतीने व भरमसाठ खर्च करून हाताशी आलेलं ऊसाचे ...

Phad kept burning and they kept looking | फड जळत राहिला आणि ते बघत राहिले

फड जळत राहिला आणि ते बघत राहिले

मलटण : उद्या किंवा परवा ऊस तोडला जाणार होता. वर्षभर अतिशय मेहनतीने व भरमसाठ खर्च करून हाताशी आलेलं ऊसाचे पीक स्वतःच्या डोळ्यासमोर जळताना बघून शेतकरी व कामगार हवालदिल झाले. निंभोरेतील या घटनेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

पुणे-पंढरपूर महामार्गावर निंभोरे येथील शेतात सायंकाळी पाच ते साडेपाच वाजता ही घटना घडली. येथील शेताच्या कोपऱ्यात महावितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर आहे. या ट्रान्सफार्मरवर विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन उडालेल्या ठिणग्या येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या ठरल्या. ऊसाचे पीक एक वर्ष ते अठरा महिने सांभाळावे लागते. त्यासाठी लागण, खुरपणी, औषध फवारणी, वेळोवेळी पाणी देणे यासह अनेक प्रक्रियेतून ऊस पीक उभे राहते. परंतु, अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

गेल्यावर्षीही याच ट्रान्सफार्मरमुळे हा फड पेटला होता. वारंवार अशी घटना होऊनही महावितरण कंपनी असंवेदनशीलपणा दाखवत आहे. दरम्यान, घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची संवेदनशीलताही महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये नसावी, हे लाजिरवाणे आहे.

वर्षभर कष्ट करून सांभाळलेला ऊसाचा फड काही मिनिटात जळून खाक झाला. ऊस जळत होता आणि शेतकरी सुन्न होईन फक्त पाहात होता. काही मिनिटात संपूर्ण फड जळला आणि त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कष्टाचीही राख होताना लोक बघत होते. अग्निशामक गाडी पोहोचली पण तोपर्यंत नव्वद टक्के ऊस जळला होता.

शेजारील फड वाचवले

शेतकरी बोबडे यांचा फड जळत असताना ते काहीही करू शकत नसल्याने शांत होते. परंतु, त्यांच्यातील सच्चा शेतकरी जागा होता. शेजारील फड वाचविण्यासाठी त्यांनी दोन्ही फडांच्या मध्ये आग लागू न देता लागलेली आग विझवून खरी संवेदनशीलता दाखवली.

०४मलटण

फलटण तालुक्यातील निंभोरे येथे गुरुवारी ट्रान्सफार्मरमधून ठिणग्या पडल्याने ऊसाच्या फडाने पेट घेतला. (छाया : विकास शिंदे)

Web Title: Phad kept burning and they kept looking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.